जळगाव - संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या हत्याकांडाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आज (शनिवारी) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने जळगाव दौरा केला. त्यांनी घटनास्थळी पाहणी करत पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना, हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाणार असल्याची घोषणा केली. तसेच या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना नियुक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात असलेल्या एका शेतात चार चिमुकल्या भावंडांची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर, या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून तिच्यासह चारही भावंडांची कुऱ्हाडीने वार करत अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. यातील चारही संशयितांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दुपारी 4 वाजता बोरखेडा भेट दिली.
हेही वाचा - बोरखेडा हत्याकांड : 'त्या' अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वाच्यता होऊ नये म्हणून चारही भावंडांची निर्घृण हत्या
बोरखेडा येथे पोहचल्यानंतर अनिल देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी करत पोलिसांकडून घटनाक्रम जाणून घेतला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी माहिती दिली. त्यानंतर देशमुख यांनी जवळच असलेल्या आदिवासी वसतिगृहात हलविण्यात आलेल्या पीडित भिलाला कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार अनिल भाईदास पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, आमदार शिरीष चौधरी, चंद्रकांत पाटील, माजी आमदार मनीष जैन उपस्थित होते. पीडित कुटुंबीयांना सरकारच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम
यावेळी अनिल देशमुख यांनी सांगितले की, बोरखेडा येथील ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. या गुन्ह्याचा तपास सुरुवातीपासून पोलिसांनी चांगल्या रितीने केला आहे. त्यामुळे पोलिसांना पॉझिटिव्ह इव्हिडन्स मिळालेले आहेत. आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी योग्यरितीने चौकशी केलेली आहे. हा संपूर्ण खटला जलदगती न्यायालयात चालविला जाणार आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करीत असल्याची घोषणा देखील अनिल देशमुख यांनी केली. निकम यांच्या माध्यमातून हा खटला पुढे चालविण्यात येणार आहे. लवकरात लवकर निकाल लागावा, अशा पद्धतीने हा खटला चालणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेत पीडितेवर अत्याचार झाल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता अनिल देशमुख यांनी अधिक बोलणे टाळले.