जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे तीन दिवसांपूर्वी घडलेल्या चार भावंडांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून आज (रविवारी) संशयित आरोपींना अधिकृतपणे अटक होऊ शकते. प्राथमिक चौकशीत या हत्याकांडात दोघांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर येत आहे. हे दोघेही आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता असल्याने ते पोलिसांच्या ताब्यात असले तरी आतापर्यंत त्यांना अटक झालेली नाही. पोलीस त्यांच्या वयाची खात्री करत आहेत. रावेर नगरपालिकेकडून त्यांच्या वयाची प्रमाणपत्रे मागविण्यात आली आहेत.
हे हत्याकांड समोर आल्यानंतर पोलिसांनी काही तासातच सात संशयितांना चौकशीकामी ताब्यात घेतले होते. परंतु, सुरुवातीला तिघांचा या हत्याकांडात सहभाग निष्पन्न होत होता. कसून चौकशी केल्यानंतर ताब्यात असलेल्या तिघांपैकी एकाचा या प्रकरणात सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा सोडून दिले. आता पोलिसांच्या ताब्यात दोन संशयित आरोपी आहेत. त्यांनी चारही भावंडांची हत्या आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांकडून या हत्याकांडाचा सविस्तर तपशील जाणून घेण्याचे काम अजूनही सुरूच आहे. दोन्ही संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, त्यांना पोलिसांनी ओळख परेडसाठी पीडितेच्या भावासमोर हजर केले होते. तेव्हा दोन्ही संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा पीडितेच्या भावाने केला आहे. दोघांपैकी एका आरोपीने 'मेरी नियत फिर गयी थी', असे सांगितल्याचे देखील समोर येत आहे. या प्रकरणात गुन्ह्याची कबुली देणारे दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत काय? याची खात्री करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्यांच्या वयासंदर्भात आज नगरपालिकेकडून प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता असल्याने त्यानंतर त्यांना रितसर अटक होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
...म्हणून पोलीस स्पष्ट बोलणे टाळत आहेत -
या हत्याकांडातील संशयित आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गुन्ह्यात वैद्यकीय अहवाल आणि पुरावे खूप महत्वाचे ठरणार आहेत. पीडितेवर झालेल्या अत्याचारासंदर्भात पीडितेचा वैद्यकीय अहवाल आणि आरोपींचे नमुने याचीही तपासणी केली जात आहे. या साऱ्या वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होईल, या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. वैद्यकीय अहवाल प्रलंबित असल्यानेच पोलीस या प्रकरणाबाबत स्पष्ट बोलणे टाळत आहेत.
या कारणामुळे आरोपींना अटक करण्यात होतोय उशीर -
दिल्लीतील निर्भया प्रकरणात एक आरोपी देखील अल्पवयीन होता. तेव्हा त्या घटनेची गंभीरता आणि पुरावे पाहून न्यायालयाने काय मत मांडले होते? याचीही पडताळणी पोलीस करत आहेत. याही हत्याकांडात आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता आहे. त्यांना अटक केली तर त्यांची रवानगी बालसुधारगृहात होईल. त्यामुळे पुढच्या तपासात अडथळे येऊन तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणून पोलीस आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करत आहेत. याच कारणामुळे आरोपींना अटक करण्यात उशीर होत असल्याची बाब समोर आली आहे.