जळगाव - 'पार्टी विथ डिफरन्स' अशी ओळख असलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बेशिस्तीचे दर्शन घडवणारा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोरोनामुळे जमावबंदीचे आदेश लागू असतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली. या कार्यकर्त्यांनी 'फिजिकल डिस्टन्सिंग' धाब्यावर बसवत जोरदार घोषणाबाजी करून शक्तिप्रदर्शन देखील केले. जामनेर तालुक्यातील पहूर येथे हा प्रकार घडला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दुपारी ते जळगावातील दौरा आटोपून पहूरमार्गे औरंगाबादला जाणार होते. याची माहिती मिळताच माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी पहूर येथे रस्त्यावर गर्दी केली. अनेकांनी हातात फडणवीस यांना समर्थन देणाऱ्या घोषणांचे बॅनर घेतले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहेत. या आदेशांचे उल्लंघन करत भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. फडणवीस पहूर येथे पोहचताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीला गराडा घातला. यावेळी पोलिसांना गर्दीला आवरताना कसरत करावी लागली. यावेळी काही प्रमाणात धक्काबुक्कीही झाली.
दरम्यान, फडणवीस पहूरला पोहचण्यापूर्वीच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर एकत्र आले होते. जमावबंदी आदेश लागू असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवले का नाही? विनाकारण गर्दी करणाऱ्या लोकांवर कारवाई का केली नाही? गर्दी करणाऱ्यांमध्ये अनेक राजकीय लोक होते, त्यांना जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य नव्हते का? असे अनेक प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित झाले आहेत.