जळगाव - जिल्ह्यात व राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. राज्यासह जिल्ह्यात देखील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, या घटना रोखण्यात महाविकास आघाडीचे राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आज जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार स्मिता वाघ, वर्षा डहाळे, शैला मोडक, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत उमा खापरे यांनी महिला अत्याचाराच्या विषयी राज्य सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. त्यांनी पुढे सांगितले की, अनेकवेळा राज्य सरकारकडे मागणी करून देखील राज्य महिला आयोगाचे पद देखील रिक्त आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन पाठविले. मात्र, त्यांनी निवेदनाला विधायक प्रतिसाद देखील दिला नाही. सरकारला जाग येणार तरी कधी? असा सवाल देखील उमा खापरे यांनी उपस्थित केला आहे.
जळगावात एका मुलीवर दोन मुलांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपी मुलांना अटक व्हावी, तसेच राज्यातील कोविड सेंटर, आश्रमशाळा तसेच पुणे, जालना, रायगड, बुलढाणा येथील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आरोपींना कडक शासन व्हावे, अशी आमची मागणी आहे, असेही त्या म्हणाल्या.
दिशा कायदा लागू करायला हवा-
आतापर्यंत राज्यात महिला अत्याचाराच्या महिन्याभरात १७ घटना घडल्या आहेत. सरकारचे तीन तिघाडा-काम बिघाडा असे कारभार सुरू आहेत. आपले हात कायद्याने बांधलेले आहेत. अन्यथा अत्याचारी, गुन्हेगारांना चौकात शिक्षा द्यायला हवी, असेही त्या म्हणाल्या. दिशा हा कायदा महाराष्ट्रात लागू केला पाहिजे तर कोठे तरी महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल, असेही उमा खापरे यावेळी म्हणाल्या.