जळगाव - मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणले होते. तेव्हा आता जे चमकत आहेत, ते नव्हते. गेल्या दहा-बारा वर्षात जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकत आहेत आणि तेच आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा कुणाचेही उघडपणे नाव न घेता स्वकियांवर टीकास्त्र डागले आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचे कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल, हे सांगता येत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुक्ताईनगर येथे आपल्या फार्म हाऊसवर एकनाथ खडसे बोलत होते. वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा स्वीकार करताना खडसेंनी आपल्या मनातील भावनांना पुन्हा एकदा वाट करून दिली. यावेळी त्यांनी पक्षातील कुरघोडीच्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त करत तुफान फटकेबाजी केली. एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मी गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. पण पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना माझ्या मनात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचे कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल, हे सांगता येत नाही, असेही खडसे यांनी म्हटले आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यावर राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचेही खडसेंनी यावेळी सांगितले.
फडणवीसांना काढला चिमटा-
'मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, ही गोष्ट जनतेला आवडली नाही का? याचा शोध मी घेत आहे. मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर सरकार आणले होते. त्या कालखंडात आता आहेत, त्यातील अनेक लोक नव्हते. अलीकडे जन्माला आलेले आम्हाला अक्कल शिकवत आहेत, असे सांगत खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटा काढला.