जळगाव - भाजपच्या पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रमांतर्गत आज (शुक्रवारी) जळगाव जिल्हाध्यक्षाची निवड होणार आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा भाजपत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या समर्थकांचे २ गट आहेत. या दोन्ही गटांपैकी कोणत्या गटाच्या पदाधिकाऱ्याची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या गोटातून जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. सध्या माजी आमदार हरिभाऊ जावळे, विधानपरिषद आमदार स्मिता वाघ, जळगाव शहर मतदारसंघाचे आमदार सुरेश भोळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य पोपट भोळे, ओबीसी सेलचे अजय भोळे आदींची नावे चर्चेत आहेत. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी उदय वाघ यांच्याकडे होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपतील गटबाजी उफाळून आल्याने त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेत डॉ. संजीव पाटील यांच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. तर, आता नव्याने जिल्हाध्यक्ष निवडला जाणार आहे.
हेही वाचा - जळगावात घरगुती कारणावरून पित्याने केली मुलीची हत्या
या निवडीसाठी एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मात्र, खडसे आणि महाजन गटाकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याने ही निवडणूक प्रक्रिया वादळी होण्याची चिन्हे आहेत.