जळगाव - महापालिकेतील नगरसेवकांचे पक्षांतर सुरूच आहे. ( Jalgaon MNC Corporator Party Change ) काही दिवसांपूर्वी भाजपच्या ४ नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला होता. ( Bjp Corporator Joined Shivsena Jalgaon ) आता सोमवारी पुन्हा भाजपच्या नगरसेविका रुकसानाबी गबलू खान यांनी पालकमंत्री गुलाबराब पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे. अजिंठा विश्रामगृहात भाजपच्या प्रभाग १ च्या नगरसेविका रुकसानाबी गबलू खान यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.
चार नगरसेवक शिवसेनेत -
भाजपचे एक-एक नगरसेवक शिवसेना आपल्याकडे ओढून घेत आहे. वर्षभरापुर्वी जळगाव मनपात बहुमतात असलेली भाजपा आज विरोध करण्यासाठी देखील सक्षम राहिली नाही. गेल्या आठवड्यात शिवसेनेमध्ये भाजपच्या चार नगरसेवकांनी प्रवेश केला होता. तर आणखी दोघांनी ऐनवेळी शब्द बदलला होता. आम्ही भाजपात असल्याचा दावा करणाऱ्या दोन्ही नगरसेविकांनी महासभेप्रसंगी शिवसेनेच्या तंबूत बसूनच सहभाग नोंदविला होता.
दरम्यान, यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, विष्णू भंगाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, चेतन सनकत, कुंदन काळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - MSRTC Merger Petition Hearing : एसटी विलीनीकरण याचिकेवर शुक्रवारी पुढील सुनावणी