जळगाव - कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने बाजारपेठांमधील सर्वच व्यवसाय हळूहळू सुरळीत होत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चलबिचल स्थितीत असलेल्या जळगावातील व्यापाऱ्यांनी आता येत्या सणासुदीत ग्राहकांना आकर्षित करण्याची तयारी सुरू केली आहे. नवरात्रोत्सव, दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ गजबजू लागली आहे. सध्या बाजारपेठेत वर्षभरासाठी लागणाऱ्या धान्याची खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर आहे.
मार्च महिन्याच्या अखेरपासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. यात वेळेची निश्चिती, फिजिकल डिस्टन्सिंगसह अनेक नियम व्यवसायात लागले. या दरम्यान संसर्गाच्या भीतीमुळे खरेदीदारही इच्छा असूनही घराबाहेर पडले नाहीत. या नियमांमुळे व्यवसायावर परिणाम झाला. यामुळे पाच महिन्यांच्या कालावधीत यंदा अनेक सण, उत्सव कोरोनामुळे हातून गेले. आता ऑक्टोबरच्या मध्यंतरास सर्वच व्यवसाय पुन्हा स्थिरावले आहेत. शहरासह जिल्ह्यासाठी धान्य, खाद्यपदार्थांसह अत्यावश्यक वस्तूंची प्रमुख बाजारपेठ असलेल्या जळगावातील दाणाबाजारपेठेत पुन्हा चैतन्य आले असल्याचे चित्र दिसून आले. यंदा पाऊस अधिक झाला असला तरी, धान्यासह डाळींची उपलब्धता मुबलक प्रमाणात असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
दसरा, दिवाळीत व्यवहार सुरळीत होण्याची अपेक्षा -
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वच अन्नधान्याची उपलब्धता व्यापाऱ्यांनी वाढवली आहे. मालाचा पुरवठा पुरेपूर आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता ग्राहक बाजारपेठात येऊ लागले आहेत. परंतु, अद्यापही ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही. गेल्या ६ महिन्यात खूप अडचणी पाहिल्या. आता हळूहळू का होईना, व्यवहार सुरळीत होत आहेत, हे आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे. दसरा, दिवाळीत चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे, अशी माहिती धान्याचे व्यापारी देवकुमार पगारिया यांनी दिली.
सात दिवस बाजारपेठ सुरू ठेवण्यात यावी -
लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आता दसरा, दिवाळीचा सण तोंडावर आहे. मात्र, यातही वेळेचा निर्णय प्रलंबित आहे, तो सोडवून संपूर्ण सात दिवस बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी. बाजारपेठांनी आता जोर धरला आहे. संसर्गाची भीती कमी झाल्याने ग्राहकही आता वाढले आहेत, अशीही अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
धान्य खरेदीला प्राधान्य -
जळगावातील दाणाबाजार हा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील नागरिक वर्षभर लागणाऱ्या धान्याच्या खरेदीसाठी येत असतात. कोरोनामुळे यावर्षी काहीशी उशिराने खरेदीची लगबग सुरू झाली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने आता खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत.