जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत चालल्याने आरोग्य यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सुश्रुषेसाठी डॉक्टर्स, नर्स यांच्यासोबत आता 'बेड साईड असिस्टंट' नेमण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांना जागेवरच नाश्ता व जेवण देणे, वेळेवर गोळ्या-औषधी देणे, त्यांना शौचालयात घेऊन जाणे व परत आणणे, रुग्णांवर देखरेख ठेवणे, अशी महत्त्वाची कामे हे बेड साईड असिस्टंट करणार आहेत. यामुळे डॉक्टर्स, नर्स यांच्यावरील कामाचा ताण तर कमी होणारच आहे, शिवाय रुग्णांना योग्य प्रकारे सुश्रृषा मिळणार आहे. कोरोनाच्या लढ्यात बेड साईड असिस्टंटची अभिनव संकल्पना राबवणारा जळगाव हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे
जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर गेल्या 4 महिन्यात जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 हजार 388 इतकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात आतापर्यंत 527 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यात 2 ऑगस्टपर्यंत 3 हजार 20 इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये साडेआठशेहून अधिक रुग्णांना कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत. त्यातही साडेचारशेहून अधिक रुग्ण हे अत्यवस्थ असून, त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मध्यंतरी जिल्ह्यातील स्थिती अतिशय बिकट झाली होती. एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत मोठ्या वाढ होत होती तर दुसरीकडे, कोरोनामुळे रुग्णांचे मृत्यू देखील मोठ्या प्रमाणावर होत होते. जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा देशात सर्वाधिक म्हणजेच एकूण रुग्णसंख्येचा 12.5 टक्के इतका झाला होता. पणनंतर स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्यूदर साडेचार टक्क्यांवर आला आहे. आता मृत्यूदर आटोक्यात येत असताना रुग्णसंख्येचा दर मात्र, कायम असल्याने प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सुश्रुषेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना चांगली सुश्रुषा मिळावी म्हणून, डॉक्टर्स आणि नर्स यांच्यासोबतच बेड साईड असिस्टंट नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेड साईड असिस्टंट संकल्पनेबाबत जागतिक आरोग्य संघटना आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील निर्देश दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने परस्परात समन्वय साधून बेड साईड असिस्टंट संकल्पना अंगीकारण्याचे ठरवून तिला मूर्त स्वरूप दिले आहे.
काय आहे नेमकी संकल्पना?
उपचार घेणाऱ्या रुग्णांवर 24 तास लक्ष असावे, यादृष्टीने डॉक्टर्स, नर्स यांच्यासोबत बेड साईड असिस्टंट कार्यरत असतील. बेड साईड असिस्टंटमुळे रुग्णसेवेवरील ताण हलका होऊन डॉक्टर्स आणि नर्स यांना केवळ वैद्यकीय सेवेवर लक्ष केंद्रित करता येईल. त्यामुळे रुग्णांना अधिक उत्तम सुश्रूषा मिळेल. सेवाभावी संस्था व संघटनांचे प्रतिनिधी, सेवाभाव करू इच्छिणाऱ्या व्यक्ती किंवा रुग्णांचे नातेवाईक हे बेड साईड असिस्टंट म्हणून काम करू शकतील. भविष्यात त्यांना मानधन देण्याचाही प्रशासनाचा विचार आहे. रुग्णांना आवश्यक ती मदत करण्यासोबतच त्यांच्यासोबत रंजक गप्पा करणे, रुग्णांकडून योगासने, व्यायाम करवून घेणे अशी कामेही ते करतील. बेड साईड असिस्टंटमुळे रुग्णांना गरजेवेळी हक्काचा माणूस उपलब्ध असेल. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांवर असणारे दडपण नसेल. आपल्या आप्तेष्टांची काळजी घेणारे रुग्णालयात कुणीतरी आहे, हा दिलासा त्यांना असेल. बेड साईड असिस्टंटला कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून पूर्णपणे खबरदारी घेतली जाणार आहे. त्यांना पीपीई कीट देणे, त्यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे, विशेष म्हणजे, त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. नर्सिंग कोर्स केलेल्या व्यक्तींना प्राधान्य असणार आहे. जिल्हा रुग्णालय अर्थात कोविड रुग्णालय आणि शासनाने अधिग्रहित केलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सद्यस्थितीत 27 बेड साईड असिस्टंट नेमले आहेत. ही संख्या अजून वाढवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. बेड साईड असिस्टंट म्हणून शक्यतो नातेवाईकांना संधी देण्याचा प्रशासनाचा विचार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांवर एक नजर
मध्यंतरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक असताना जिल्हा रुग्णालयासह तालुका पातळीवर असणारी ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्र, नगरपालिकेची रुग्णालये याठिकाणी बेड्स अपूर्ण होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सोयीसुविधा असलेली खासगी रुग्णालये त्या-त्या हॉटस्पॉट असलेल्या भागात अधिग्रहित केली होती. परंतु, नंतर जिल्हा रुग्णालय हे पूर्णपणे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे, जळगावपासून जवळच असलेले डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय कोरोनासाठी अधिग्रहित करण्यात आले. दोन्ही ठिकाणी ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवण्यात आली. याशिवाय तालुका पातळीवर देखील ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्र, नगरपालिकेची रुग्णालये याठिकाणी कोविड आणि नॉन कोविड रुग्णालये उभारण्यात आली. सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर तालुका पातळीवर उपचार होतात. तीव्र लक्षणे असलेल्या तसेच अत्यवस्थ रुग्णांना थेट जिल्हा कोविड रुग्णालयात किंवा डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार केले जातात. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 20 इतके सक्रीय (ऍक्टिव्ह) रुग्ण आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये साडेआठशेहून अधिक रुग्णांना कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत. त्यातही साडेचारशेहून अधिक रुग्ण हे अत्यवस्थ आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 712 बेड्स उपलब्ध आहेत. सध्या कोविड रुग्णालयात 357, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात 350 बेड्स आहेत. याठिकाणी अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच इकरा महाविद्याच्या सेंटरमध्ये 50 बेड्स असून तेथे मध्यम लक्षणे असलेले रुग्ण दाखल केले जातात. तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात 400 बेड्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे शासकीय तंत्रनिकेतन आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा आहे. तालुका पातळीवर उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्र तसेच नगरपालिकेच्या रुग्णालयांमध्येही कोविड आणि नॉन कोविड अशी रचना केली असून, जिल्ह्यात ग्रामीण भागातही सुमारे 550 ते 600 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. आजरोजी प्रशासनाकडे सध्याच्या रुग्णसंख्येसाठी आवश्यक असणारी यंत्रणा उपलब्ध आहे. भविष्यात गरज भासल्यास शासनाच्या 80-20 पॅटर्नप्रमाणे खासगी रुग्णालये अधिग्रहित केली जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना दिली.