जळगाव - जिल्ह्यातील जळगाव, यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांमध्ये मागील ३ दिवसात वादळी मान्सूनपूर्व पाऊस झाला. यामुळे सुमारे दीड हजार हेक्टरवरील कापणीवर आलेली केळी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील ३ दिवसात वादळी मान्सूनपूर्व पाऊस झाला. जळगाव, चोपडा, यावल या तीन तालुक्यांमध्ये या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. वादळामुळे केळी जमीनदोस्त झाली. तिन्ही तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात १ हजार ६१७ हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पाहणीच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
वादळी पावसामुळे यावल तालुक्यातील ९ गावांमधील २२५, जळगाव तालुक्यातील १४ गावांमधील ३७७ तर चोपडा तालुक्यातील २० गावांमधील १ हजार ६२ शेतकरी बाधित झाले आहेत. एकूण ४३ गावांमधील १ हजार ६६४ शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहेत. चोपडा तालुक्यात सर्वाधिक १ हजार ९० हेक्टरवर केळीचे नुकसान झाले आहे. यावल तालुक्यात २०८.२० तर जळगाव तालुक्यात ३१९.५० हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठवला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
मागील वर्षाच्या नुकसान भरपाईसाठी १५ कोटींची मदत -
जळगाव जिल्ह्यात जून २०१८ मध्ये अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना १५ कोटी ८२ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यास मान्यता दिली आहे. ही रक्कम तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.