जळगाव - जिल्ह्यातील धरणगाव येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी मरिमातेच्या यात्रोत्सवानिमित्त राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 'महाराष्ट्र केसरी' बाला रफिक आणि हरियाणाचा प्रसिद्ध मल्ल 'भारत केसरी' तेजवीर पुनिया यांच्यात झालेली मानाची कुस्ती प्रमूख आकर्षण ठरली. अतिशय उत्कंठावर्धक झालेल्या या कुस्तीत बालाने पुनियाला आस्मान दाखवत 'खान्देश केसरी'ची गदा पटकावली.
हेही वाचा - आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंनी मॅटवरील कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवावे - शरद पवार
धरणगाव शहरातील श्री व्यायाम प्रसारक मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा विविध वजन गटात पार पडली. विशेष म्हणजे, यावेळी मुलींच्या देखील कुस्ती लावण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सर्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू 'महाराष्ट्र केसरी' बाला रफिक आणि हरियाणाचा प्रसिद्ध मल्ल तथा 'भारत केसरी' तेजवीर पुनिया यांच्यातील कुस्ती ठरली.
हेही वाचा - कर्जतमध्ये रंगला कुस्त्यांचा फड; स्पर्धेत राज्यासह देशातील नामवंत मल्लांचा समावेश
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बाला आणि पुनिया यांच्यात कुस्ती लावण्यात आली. कुस्तीला प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीला पुनियाने आपले डाव टाकत बालाला कोंडीत पकडले होते. तब्बल १५ ते २० मिनिटे त्याने बालाला जखडून ठेवले. ही कुस्ती पुनिया एकहाती जिंकेल, असे वाटत असतानाच बालाने अचानक कुस्तीला कलाटणी दिली. प्रारंभी वरचढ ठरलेल्या पुनियाला त्याने एका झटक्यात धोबी पछाड देत 'खान्देश केसरी'च्या गदेवर आपले नाव कोरत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विजयी ठरलेल्या बालाला मान्यवरांच्या हस्ते खान्देश केसरीची गदा आणि पारितोषिकाची रक्कम देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेता ठरलेल्या पुनियाला देखील उपविजेत्यासाठी असलेली पारितोषिकाची रक्कम देऊन गौरविण्यात आले.
हेही वाचा - लहानपणी 'या' पैलवानाचे फॅन होते नागराज मंजुळे
कुस्ती स्पर्धेला ८४ वर्षांची थोर परंपरा-
श्री व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला सुमारे ८४ वर्षांची परंपरा लाभली आहे. धरणगावातील यज्ञेश्वर माधव भावे उर्फ बाळू मास्तर वस्ताद यांनी सन १९३५ मध्ये धरणगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या मरिमाता यात्रोत्सवानिमित्त या कुस्ती स्पर्धेला सुरुवात केली होती. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी कुस्त्या होतात. तर शेवटच्या मंगळवारी मोठ्या कुस्त्या होतात. त्यात पंजाब, हरियाणा, महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, कराड, सोलापूर तसेच नागपूर येथील नामांकित पैलवान कुस्तीसाठी येतात. गेल्या २ वर्षांपूर्वी ट्रिपल महाराष्ट्र केसरी असलेले विजय चौधरी हे देखील मरिमाता यात्रोत्सवानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेच्या आखाड्यात उतरले होते. हा आखाडा गाजवल्यानंतर त्यांनी पुढे महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला. या यात्रोत्सवाचा आनंद घेण्यासाठी धरणगाव शहराच्या पंचक्रोशीतील हजारो लोक हजेरी लावतात. या कुस्ती स्पर्धेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणाऱ्या लोकांना आयोजकांच्या वतीने फेटे बांधले जातात. हा फेटा खूप मानाचा मानला जातो.