जळगाव - सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना आमदार करत अनपेक्षित निकाल देणारा मतदारसंघ म्हणून अमळनेर विधानसभा मतदारसंघाची ओळख निर्माण झाली आहे. विद्यमान आमदार शिरीष चौधरी व विधानपरिषद आमदार स्मिता वाघ हे यावेळी रिंगणात राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील हे देखील इच्छुक आहेत. या दिग्गजांसह इतरही काही इच्छुक उमेदवार आपले भाग्य आजमावतील. त्यामुळे मतदार कुणाला कौल देतात, याबाबत उत्सुकता आहे.
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे नाव घेतले की माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे नाव डोळ्यासमोर येते. खान्देशची मुलुख मैदान तोफ तसेच कापसाला रास्त भाव मिळावा यासाठी काढलेला शिंगाडे मोर्चा, विनोदी शैलीत आक्रमकपणे सभागृह गाजवणारे आमदार म्हणून गुलाबरावांची महाराष्ट्रात ख्याती होती. त्यानंतर सलग तीनवेळा भाजपकडून डॉ. बी. एस. पाटील विजयी झाले होते. २००९च्या मतदारसंघ विभाजनानंतर अपक्ष म्हणून साहेबराव पाटील आमदार म्हणून निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत अपक्ष शिरीष चौधरी २१,२३९ मतांनी विजयी झाले. तेव्हा भाजपचे अनिल भाईदास पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार साहेबराव पाटील हे पराभूत झाले होते. आता या मतदारसंघात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. अनिल भाईदास पाटील हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर माजी आमदार साहेबराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत दाखल झाले आहेत. अनिल पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. साहेबराव पाटील भाजपकडून इच्छुक आहेत. विद्यमान आमदार शिरीष चौधरी हे अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. विधानपरिषद आमदार स्मिता वाघ तसेच त्यांचे पती तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे देखील भाजपकडून इच्छुक आहेत. पण वाघ दाम्पत्याला भाजप संधी देईल, अशी शक्यता कमी आहे.
युतीनंतर ठरतील समीकरणे-
या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्या खालोखाल माळी, राजपूत, बौद्ध व इतर समाजही बहुसंख्येने आहेत. २०१४ पूर्वी भाजप आणि सेनेत असलेल्या युतीच्या फॉर्म्युल्यात ही जागा सेनेच्या वाट्याला आहे. युती झाली तर ही जागा सेनेला सुटेल. मात्र, युती फिस्कटली तर मात्र, भाजप याठिकाणी विद्यमान आमदार शिरीष चौधरी किंवा माजी आमदार साहेबराव पाटील यांना सेनेच्या उमेदवाराला शह देण्यासाठी रिंगणात उतरवेल. युती झाली नाही तर सेनेला तुल्यबळ उमेदवार शोधण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. असे असले तरी या मतदारसंघात प्रमुख लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप किंवा सेनेच्या उमेदवारात होईल. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी साहेबराव पाटील हे देखील अमळनेर विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावू पाहत आहेत. त्यांनी भाजप प्रवेश केला आहे खरा; पण युती झाली नाही तर ते सेनेकडून लढतील.
पाडळसरे धरणाचा मुद्दा असेल केंद्रस्थानी-
अमळनेर तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या तापी नदीवरील पाडळसरे धरणाचे काम वर्षानुवर्षे अपूर्ण आहे. अनेकदा आंदोलने झाली तरी या प्रकल्पासाठी पुरेसा निधी मिळत नाही. लोकप्रतिनिधींकडून आतापर्यंत फक्त आश्वासनेच पदरात पडली आहे. प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा गाजतो. मात्र, धरण काही पूर्ण होत नाही. या निवडणुकीत देखील पाडळसरे धरणाचा मुद्दा केंद्रस्थानी असेल. त्याचप्रमाणे युवकांसाठी रोजगार, पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर देखील भर दिला जाईल. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अमळनेरात भाजपच्या मेळाव्यात भाजपचे माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केली. हा मुद्दा राज्यभर गाजला होता. हा मुद्दा विरोधक प्रचारात आणून त्याचा ढाल म्हणून वापर करू शकतात.
हे असू शकतात संभाव्य उमेदवार-
विधानसभा निवडणुकीसाठी अमळनेरमधून आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ हे पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यासोबतच उदय वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील, भिकेश पाटील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी साहेबराव पाटील हेही इच्छुक आहेत.
असा आहे अमळनेर मतदारसंघ-
एकूण मतदार : २ लाख ८९,५६३
पुरुष मतदार : १,५०,६९३
महिला मतदार : १,३८,८७०
२०१४ विधानसभेत कुणाला विजय-
शिरीष चौधरी : (अपक्ष) ६८,१४९
अनिल पाटील : (भाजप) ४६,९१०
साहेबराव पाटील : (राष्ट्रवादी) ४३,६६७
गिरीश पाटील : (काँग्रेस) १४५८
२०१९ लोकसभा निवडणुकीत कुणाला मताधिक्य-
भाजप : १ लाख ३,७४७
राष्ट्रवादी काँग्रेस : ४२ हजार ९१३