जळगाव - प्रेमसंबंधाच्या संशयावरून शहरातील एका १८ वर्षीय तरुणाची गुजरात राज्यातील सुरत येथे हत्या करण्यात आली. काही तरुणांनी चाकूने भोसकून या तरुणाचा खून केला. रितेश सोमनाथ शिंपी (व.१८, रा. खडके चाळ, शिवाजीनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुरतच्या दिंडोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत रितेश शिंपी हा शहरातील शिवाजीनगर भागात राहतो. तो कानबाई मातेच्या उत्सवासाठी शनिवारी रात्री सुरत येथे त्याच्या मावशीकडे गेला होता. सुरतच्या नवागाम दिंडोली परिसरात त्याची मावशी राहते. याच परिसरातील एका तरुणीसोबत रितेशचे प्रेमसंबंध असल्याचा तरुणीच्या नातेवाईकांना संशय झाला होता. त्यानंतर ते रितेश सोबत सतत वाद घालत होते. यापूर्वी अनेकदा त्यांच्यात वाद झाला होते. तरुणीशी संबंध ठेऊ नको, सुरतमध्ये येऊ नको, अन्यथा जीवे ठार मारू, अशा धमक्या त्यांनी रितेशला दिल्या होत्या.
मात्र, या सर्वांना न जुमानता रितेश शनिवारी रात्री कानबाई उत्सवानिमित्त सुरतला गेला. ही बाब तरुणीच्या नातेवाईकांना कळली. सोमवारी कानबाईच्या विसर्जन मिरवणुकीत रितेश नाचत होता. त्यादरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी रितेशला मारहाण केली. यावेळी मारहाण करणाऱ्या एका तरुणाने रितेशच्या पोटात चाकू भोसकला व त्यानंतर दोन्ही हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
त्यानंतर काही नागरिकांनी जखमी अवस्थेत रितेशला सुरत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. काही तास उपचार केल्यानंतर मंगळवारी पहाटे रितेशचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच रितेशच्या कुटुंबीयांनी सोमवारी रात्रीच सुरत येथे धाव घेतली होती. या प्रकरणी दिंडोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.