जळगाव - पूर्व खान्देशातील म्हणजे आताच्या जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर हे शहर 'प्रतिपंढरपूर' म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. संत सखाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अमळनेर शहराला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे.
अमळनेर शहराचे नाव घेतले, की संत सखाराम महाराज, प्रसिद्ध उद्योगपती श्रीमंत प्रतापशेठ तसेच साने गुरुजी आठवतात. साने गुरुजींच्या वास्तव्यामुळे अमळनेर शहराची शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात प्रगती होत गेली. साने गुरुजींच्या संस्कारांमुळेच अमळनेरकरांना देशभक्तीची प्रेरणा मिळाली. तर उद्योगपती श्रीमंत प्रतापशेठ यांच्यामुळे अमळनेरच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली. याहून अधिक महत्त्वाची ओळख अमळनेर शहराला मिळाली, ती म्हणजे संत सखाराम महाराज यांच्यामुळे. साधारणपणे २०० वर्षांपासून म्हणजेच संत सखाराम महाराज यांच्या वास्तव्यापासून अमळनेर शहराला परमार्थिक क्षेत्रातही एक आगळेवेगळे अलौकिक महत्त्व प्राप्त झाले.
आज शहरीकरणामुळे अमळनेर शहराचा विस्तार चहुबाजूंनी झाला आहे. पण संत सखाराम महाराजांचे वास्तव्य असताना बोरी नदीच्या दोन्ही काठांवर वसलेले एक छोटेसे गाव असे अमळनेरचे स्वरूप होते. बोरी नदीच्या पूर्वेकडील काठावर असलेले गाव म्हणजे पैलाड तर पश्चिम काठावर असलेले गाव म्हणजे अमळनेर, अशी या छोट्याशा गावाची खरी ओळख होती. पश्चिमेकडील एका घाटावरून बोरी नदीच्या पात्रात उतरल्यानंतर दक्षिणेकडे दिसणाऱ्या समाधी व उत्तरेकडे पाहिल्यावर दिसून येणारा दगडीपूल व त्याच्या पलीकडे रेल्वेपूल दिसतो. हे सारे चित्र पाहिले की क्षणभर पंढरपूरच्या वाळवंटात उभे असल्याचा भास होतो. त्यामुळेच अमळनेर शहराला फार पूर्वीपासून प्रतिपंढरपूर म्हणून ओळख लाभली आहे. नंतरच्या काळात संत सखाराम महाराजांमुळे शहराला लाभलेल्या वारकरी संप्रदायाच्या वारसाने प्रतिपंढरपूर म्हणून असलेली ओळख अधिकच वृद्धिंगत झाली. अशा या प्रतिपंढरपुरात २०० वर्षांहून अधिक काळापासून संत सखाराम महाराज व वाडी मंदिर या दोन बाबी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.
सखाराम महाराज वाडी मंदिराविषयी थोडेसे -
आपल्या चुलत बंधूंच्या घरातून विभक्त होऊन बाहेर पडल्यानंतर सखाराम महाराजांनी बोरी नदीच्या काठी एक झोपडी बांधली. त्या झोपडीत ते राहत होते. पंढरपूरच्या वारीला जाताना ती झोपडी ते नष्ट करून टाकत असत. पुढे श्रीमंत पेशवे यांच्या प्रेरणेने अमळनेरच्या देशमुख मंडळींनी त्या झोपडीच्या जागेत एक मंदिर बांधले. त्या ठिकाणी पूर्वी खरबुजांची वाडी होती. त्यामुळे ते मंदिर 'वाडी' या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही मंदिराचे तेच नाव प्रचलित आहे. अमळनेरला वाडी चौक प्रसिद्ध आहे. त्या चौकात गेल्यावर पूर्व दिशेला हे वाडी मंदिर आहे. या मंदिराचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्याला शिखर नाही. पुढे निरनिराळ्या महाराजांच्या काळात या वाडी मंदिराचा खूप विस्तार झाला. गणेश मंदिर, हनुमान मंदिर, स्वयंपाकगृह, भोजनगृह, पागा, कोठीघरे, धर्मशाळा, गंगामाई मंदिर अशा अनेक इमारती वाडीला जोडून बांधल्या आहेत. याखेरीज अमळनेर येथील देवस्थानच्या असलेल्या इतर इमारती, पंढरपूर, पैठण मठ, आळंदी येथे असलेले मठ, देवस्थानला इनाम म्हणून मिळालेल्या अनेक जमिनी या सर्वांचे मिळून एक श्री विठ्ठल रखुमाई संस्थान निर्माण झाले आहे.
श्री सखाराम महाराज यांची गादी परंपरा-
सखाराम महाराज (गादी- इ.स. १७८०, कारकीर्द- ३८ वर्षे), गोविंद महाराज (गादी- इ.स. १८१८, कारकीर्द- ३३ वर्षे), बाळकृष्ण महाराज (गादी- इ.स. १८५१, कारकीर्द- १७ वर्षे), प्रल्हाद महाराज (गादी- इ.स. १८६८, कारकीर्द- १७ वर्षे), तुकाराम महाराज (गादी- इ.स. १८८५, कारकीर्द- ११ वर्षे), कृष्ण महाराज (गादी- इ.स. १८९६, कारकीर्द- १ वर्ष), बाळकृष्ण महाराज (आंधळे) (गादी- इ.स. १८९७, कारकीर्द- ३३ वर्षे), वासुदेव महाराज (गादी- इ.स. १९३०, कारकीर्द- २२ वर्षे), पुरुषोत्तम महाराज (गादी- इ.स. १९५२, कारकीर्द- १२ वर्षे), ज्ञानेश्वर महाराज (गादी- इ.स. १९६४, कारकीर्द- २३ वर्षे) आणि सध्या ११ वे गादीपती म्हणून प्रसाद महाराज हे परंपरा चालवत आहेत. ते २३ जुलै १९८७ रोजी गादीवर विराजमान झाले आहेत.
सखाराम महाराज यात्रोत्सव-
खान्देशचे भूषण समजल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज यांच्या यात्रोत्सवाची मुहूर्तमेढ अक्षय तृतीयेला होते. त्यादिवशी वाळवंटात सखाराम महाराजांच्या समाधीसमोर स्तंभारोपण होते. त्यानंतर यात्रेला सुरुवात होते.
प्रतिपंढरपूर असणाऱ्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज वारीची परंपरा सुमारे २०० वर्षांपासून सुरू आहे. ही परंपरा त्यांचे गादीपती संत प्रसाद महाराज यांनीही कायम ठेवली आहे. ज्येष्ठ वद्य प्रतिपदा एकला दरवर्षी महाराज येथून वारीसाठी निघतात. सुमारे २३ दिवसांचा हा प्रवास असतो. पारोळा, भडगाव, नागद, राजराय टाकडी, म्हारोळा, पैठण, पाथर्डी, आष्टी, करमाळा, वडशिवणे, करकंबमार्गे आषाढ शुद्ध नवमीला ते पंढरपूरला पोहोचतात. कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत तेथे ते चार महिने वास्तव्यास असतात. तेथून मग कार्तिक पौर्णिमेला निघून मार्गशीर्ष वद्य एकादशीला ते पुन्हा अमळनेरला येतात. हा प्रवास आळंदीमार्गे ४१ दिवसांचा असतो. यावेळी त्यांच्यासोबत भाविक मोठ्या संख्येने असतात.