जळगाव - 'सीसीआय' अर्थात भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगमध्ये कापूस खरेदी केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे. सीसीआयचे अधिकारी प्रतवारीचे कारण पुढे करत शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीला नकार देत आहेत. मात्र, याठिकाणी खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी करणे सुरू आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी केंद्रावर ठिय्या मांडत खरेदी रोखली.
हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाण्यासाठी माझ्या शुभेच्छा'
खरीप हंगामातील कापूस खरेदी करण्यासाठी सीसीआयच्या वतीने जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जळगाव तालुक्यासाठी आव्हाणे शिवारातील लक्ष्मी कॉटन स्पिनिंग अँड जिनिंगमध्ये खरेदी केंद्र आहे. या केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे. मात्र, प्रतवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे. शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करताना सीसीआयने काही निकष ठरवून दिलेले आहेत. त्यात प्रमुख निकष हा कापसातील आर्द्रतेचा आहे. आर्द्रतेच्या टक्केवारीनुसार कापसाला प्रतिक्विंटल दर सीसीआयकडून दिला जात आहे. कापसात 8 टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असेल तर कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळतो.
सीसीआयचे अधिकारी कापसाची आर्द्रता तपासताना ती बिनचूक मोजत नाहीत. काहीही निकष पुढे करत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करत नाहीत. असंख्य शेतकऱ्यांना हा त्रास होत असल्याचा आरोप केला जात आहे. अनेक शेतकरी भाड्याच्या वाहनातून कापूस विक्रीसाठी केंद्रावर आणतात. मात्र, कापूस खरेदीला नकार दिल्यानंतर शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्याला कवडीमोल दरात कापूस विकावा लागतो. हा प्रकार थांबला पाहिजे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. शुक्रवारी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी थेट या केंद्रावरील खरेदीच थांबवली. या प्रकाराची माहिती झाल्यानंतर पंचायत समितीचे सदस्य अॅड. हर्षल चौधरी यांनी केंद्रावर धाव घेतली. त्यांनी सीसीआयच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याची विनंती केली. मात्र, चौधरी यांच्याशी देखील सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अरेरावी केली. त्यामुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले. जोपर्यंत शेतकऱ्यांचा कापूस का खरेदी केला जात नाही तोपर्यंत खरेदी सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.
व्यापारी खाताहेत शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी -
सीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून प्रतवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या कापसापेक्षा खराब दर्जाचा तसेच अधिक आर्द्रतेचा कापूस सीसीआयचे अधिकारी खरेदी करत आहेत, असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. सीसीआयच्या अधिकाऱ्यांचे काही खासगी व्यापाऱ्यांशी साटेलोटे असल्यानेच हा प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात खरेदी केलेला कापूस व्यापारी सीसीआयच्या केंद्रावर शासनाच्या हमीभावात विकत आहेत. शेतकऱ्याच्या एका क्विंटल कापसामागे व्यापाऱ्याला एक ते दीड हजार रुपये नफा सहज मिळत आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खात असताना प्रशासनाकडून मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आम्ही भारतीय कापूस महामंडळाने ठरवून दिलेल्या निकषानुसारच कापूस खरेदी करत असल्याचे स्पष्टीकरण सीसीआयचे अधिकारी देत आहेत. व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या खरेदीबाबत मात्र ते बोलणे टाळत आहेत.
हेही वाचा - जळगावात भीक मागण्यासाठी शाळकरी मुलाचे अपहरण
व्यापाऱ्यांची अशी आहे शक्कल -
प्रतवारीच्या नावाखाली नाकारलेला कापूस खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात विकत घेतात. हाच कापूस ते सीसीआयच्या केंद्रावर विकत आहेत. सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा, आधारकार्ड ही कागदपत्रे लागतात. व्यापारी दुसऱ्याच शेतकऱ्याच्या कागदपत्रांवर कापूस सीसीआयला विकून लाखो रुपये कमावत आहेत. अनेक व्यापारी बडे शेतकरी आहेत. ते छोट्या शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. अनेक व्यापारी तर गरजू शेतकऱ्याला पैशांचे आमिष दाखवून त्याच्या कागदपत्रांवर आपला माल विकत असल्याचे चित्र आहे. या साऱ्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.