जळगाव - शेती हे शास्त्र आहे, ज्यांना शेतीचे तंत्र उमगते त्यांचे उत्पादन निश्चित वाढते. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरुन शेतीचे तंत्र समजून घेऊन त्याचे शास्त्रज्ञ बनावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
जळगाव जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात हरितक्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री पाटील बोलत होते.
हेही वाचा - विठ्ठला, राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर; मुख्यमंत्र्याचे विठ्ठलाला साकडे
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी परंपरागत शेती न करता शेती हे शास्त्र असल्याचे समजून घ्यावे. शेतीचे तंत्र समजून घेऊन आधुनिक प्रयोग करावेत. शेतीला पुरक व्यवसाय सुरु करावेत. जेणेकरुन आपले उत्पन्न वाढण्यास मदत होईल. शेतकरी आणि वारकरी यांचे घनिष्ठ नाते आहे. आषाढी एकादशी आणि कृषी दिन एकाच दिवशी येणे हाही एक योगायोगच असून कोरोनाचे संकट जावू दे, चांगला पाऊस पडू दे आणि माझ्या शेतकरी राजाला चांगले बळ दे, अशी विनंती पांडूरंगाच्या चरणी करत जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
या कार्यक्रमाची सुरुवात हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली. तसेच 1 ते 7 जुलै दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या कृषी संजिवनी सप्ताहाचे पालकमंत्र्यांचे हस्ते उद्धघाटन करण्यात आले. यावेळी पोकरा योजनेचा लाभ घेऊन नवनवीन प्रयोग करणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर आदी उपस्थित होते.