जळगाव - केंद्र सरकारच्या वतीने प्रस्तावित असलेल्या एनआरसी तसेच सीएए कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी मंगळवारी जळगाव मुस्लिम मंचच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. डिटेन्शन कॅम्पची प्रतिकृती उभारत मुस्लिम मंचने केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला. डिटेन्शन कॅम्पच्या माध्यमातून एनआरसी तसेच सीएए कायदा कसा अन्यायकारक आहे, हे सांगण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
जळगाव मुस्लिम मंचतर्फे केंद्र सरकारच्या वतीने प्रस्तावित असलेल्या एनआरसी तसेच सीएए कायद्याला विरोध करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर गेल्या 2 महिन्यांपासून साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाच्या 63 व्या दिवशी मुस्लिम मंचच्या वतीने डिटेन्शन कॅम्पची प्रतिकृती तयार करण्यात आली. यावेळी जनाजा देखील तयार करण्यात आला होता. 'एकवेळ आम्ही मरण स्वीकारू; पण डिटेन्शन कॅम्पमध्ये जाणार नाही', अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी जाहीर केली.
केंद्र सरकार जोपर्यंत हा अन्यायकारक कायदा मागे घेत नाही; तोवर अशाच पद्धतीने आंदोलन सुरू राहील, असे सांगत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, या आंदोलनात मुस्लिम मंचसह विविध संघटनांनी सहभाग नोंदवला होता.