जळगाव - भाजप सत्ताधारी असलेल्या जळगाव महापालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्तीच्या कामाऐवजी जागोजागी रस्त्यांवर दुभाजक उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याचे काम सोडून दुभाजक उभारले जात आहेत. यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूककोंडी होत आहे. शिवाय शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका सध्या जळगावकरांना सहन करावा लागत आहे. शहरातील दयनीय रस्त्यांमुळे जळगावकर अक्षरशः हैराण झाले आहेत. केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे. त्यानंतर रस्ते दुरुस्ती झालेली नाही. अमृत योजनेनंतर लगेचच भूमिगत गटारींच्या कामाला सुरुवात होणार आहे. अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी भूमिगत गटारींचे काम पूर्ण झाल्यानंतरच रस्त्यांची दुरुस्ती करणे शक्य होणार आहे, असे सांगत महापालिका प्रशासन रस्ते दुरुस्तीच्या विषयाला बगल देत आहे.
एकीकडे रस्ते दुरुस्तीचा विषय प्रलंबित आहे. मात्र, दुसरीकडे महापालिका प्रशासनाने जागोजागी रस्त्यांवर दुभाजक उभारण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम सुरू करण्यापूर्वी रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. दुभाजक टाकल्यामुळे रस्ते अरुंद झाले असून वाहतूककोंडी उद्भवत आहे. छोटेमोठे अपघात देखील वाढले आहेत. दुभाजकांचे काम तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होत आहे.
दुभाजकांसाठी खोदकाम केल्याने माती रस्त्यांवर आली आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे ही माती धूळ स्वरूपात हवेत पसरते. त्याचाही त्रास वाहनधारकांसह रस्त्यांवरील दुकानदारांना सहन करावा लागत आहे. दुभाजक उभारण्याचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच पडलेले आहे. त्याचाही अडथळा वाहनांना होत आहे. दुभाजकांमुळे आहे ते रस्तेही अरुंद झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
अमृत योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून चालढकल सुरू असल्याने रस्ते दुरुस्ती बारगळली आहे. त्यामुळे जळगावकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांच्या त्रासाला कंटाळून 'भीक नको, पण कुत्रं आवर' असे म्हणण्याची वेळ जळगावकरांवर आली आहे.