जळगाव - पाचोरा शहरातील श्री.गो.से. हायस्कुलची विद्यार्थिनी अबोली दादाभाऊ मांडगे हिने दहावीच्या परीक्षेत 98.80 टक्के गुण मिळवून जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावर्षी दहावीच्या निकालात जळगाव जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय क्रमांक मुलींनीच पटकावत मुलांपेक्षा आपणच हुशार असल्याचे दाखवून दिले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला. या निकालात जळगाव जिल्ह्यातून अबोली मांडगे ही 98.80 टक्के गुण मिळवून पहिली आली आहे. चाळीसगाव शहरातील आनंदीबाई बंकट हायस्कुलची विद्यार्थिनी ऋतुजा संजय चौधरी ही 98.40 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात दुसरी तर पाचोरा शहरातील श्री गो.से. हायस्कुलचा विद्यार्थी युगंधर अमोल पाटील याने 97.60 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
जळगाव शहरातून प्रज्ज्वल प्रकाश पाटील याने 96.40 टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर सिद्धी विक्रांत पाटील हिने 96 टक्के गुण मिळवत शहरातून दुसरा क्रमांक मिळवला आहे. हे दोघेही ब.गो. शानबाग विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.