जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच आहे. आज सहावा रुग्ण आढळला. अमळनेर येथील एका 73 वर्षीय वृद्धाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या वृद्धाला 20 एप्रिलला जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल केले होते. मात्र, त्याच दिवशी वृद्धाचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 3 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
आतापर्यंत अमळनेरात 4 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वी अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील 63 वर्षीय वृद्ध महिला, त्यानंतर एक दाम्पत्य आणि आता 73 वर्षीय वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील एक महिला आणि वृद्धाचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जळगावात कोरोनामुळे तिघांचा बळी गेला आहे, तर 2 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समाधानाची बाब म्हणजे, जळगावातील मेहरुणच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने कोरोनावर मात केली असून तो पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे.
अमळनेर शहरातील एका 73 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने 20 एप्रिलला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, या वृद्धाचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. वृद्धाचा स्वॅब घेऊन तो धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल आज सकाळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या वृद्धाची कोणतीही ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही. तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने संक्रमित झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.
मृत वृद्ध क्षयरोगाने होता संक्रमित -
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाला क्षयरोग होता. शिवाय त्याचे वय 73 वर्षे असल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली होती. अशातच कोरोनाची लागण झाल्याने त्याचा तातडीने मृत्यू झाला असावा, असा निरीक्षण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.
कोरोना अपडेट्स -
- सद्यस्थितीत उपचार घेणारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - 2
- कोरोनामुळे झालेले मृत्यू - 3
- कोरोनातून बरे झालेले रुग्ण - 1