जळगाव - अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथील एका शेतकऱ्याच्या राहत्या घराला आग लागल्याची घटना घडली. अशोक केशवराव शिंदे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेत शिंदे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यासह कापूस विक्री करून आणलेली तीन लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली. या घटनेमुळे शिंदे कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
अशोक शिंदे हे नेहमीप्रमाणे पत्नीसह घराला कुलूप लावून शेतात कामासाठी गेले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्या घरातून अचानक धुराचे लोळ निघताना काही ग्रामस्थांनी पाहिले. यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु घर बंद असल्याने आग विझवता येत नव्हती.
ग्रामस्थांनी केले शर्थीचे प्रयत्न..
शिंदे यांच्या घराला आग लागल्याचे दिसल्यानंतर ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात येत नव्हती. शेवटी काही ग्रामस्थांनी अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. काही वेळाने अग्निशमन बंब गावात दाखल झाला. बराच वेळ शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्या होत्या.
तीन लाखांचा झाला कोळसा..
शिंदे यांच्या घरात कापूस विक्रीतून आलेली तीन लाख रुपयांची रोख रक्कम व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. आग इतकी मोठी होती की, घरातील धातूचे भांडेही वितळून गेले. या आगीत शिंदे यांच्या शेजारी असलेले प्रकाश साहेबराव शिंदे यांचे गुरांचा चारा भरलेले घरदेखील जळून खाक झाले. यात शिंदे यांचे मोठे आर्थिक झाले आहे.
हेही वाचा - पवित्र युती सोडून शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली; अमित शाहांचा हल्लाबोल