जळगाव - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांसह प्रशासकीय यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल ९७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या २८५४ वर जाऊन पोहोचली आहे.
जिल्हा प्रशासनाला गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये सर्वाधिक २७ रुग्ण हे भडगाव या ठिकाणी आढळले आहेत. त्या खालोखाल २१ रुग्ण एरंडोल तालुक्यात आढळून आले आहेत. भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर तसेच पारोळा या ठिकाणीदेखील सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर ७, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ५, अमळनेर ६, चोपडा ६, पाचोरा ९, भडगाव २७, धरणगाव ५, यावल ४, एरंडोल १२, जामनेर १०, रावेर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
हेही वाचा - धक्कादायक! जळगाव जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांजवळ नातेवाईकांचा सर्रास वावर
१७१९ रुग्णांची कोरोनावर मात -
आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील १ हजार ७१९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आज (गुरुवारी) देखील ४६ जणांना घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत ९३१ जणांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी ५ रुग्णांच्या मृत्यूचे अहवाल प्राप्त -
गुरुवारी जिल्ह्यातील ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोना बळींची संख्या २०९ इतकी झाली आहे. गुरुवारी जळगाव शहरातील २८ वर्षीय युवकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर जिल्ह्यामध्ये नाशिक येथे एका ४६ वर्षीय युवकाचा तर धुळे येथे ७६ वर्षाचा वृद्ध व ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.