जळगाव - सोशल डिस्टन्सिंगचा भंग व सम-विषम नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून शहरातील विविध भागातील 7 दुकाने सील करण्यात आली. आतापर्यंत महापालिकेने 53 दुकाने सील केली असून, त्यापैकी 13 दुकानदारांना 5 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महात्मा फुले व गोलाणी मार्केटमध्ये ही कारवाई करण्यात आली. दररोज मनपाकडून प्रशासनाची परवानगी नसतानाही दुकाने उघडणाऱ्यांवर, सोेशल डिस्टन्सिंगचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही अनेक दुकानदार व व्यवसायिक मनपा प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत.
बुधवारी महात्मा फुले मार्केटमध्ये रेडीमेड कपड्यांचे दुकान परवानगी नसतानाही सुरू असल्याचे मनपाच्या पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर हे दुकान सील करण्यात आले. यासह गणेश कॉलनी चौक परिसरात सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याची परवानगी असतानाही दोन दुकानदारांनी सोमवारी दुकान उघडल्यानंतर मंगळवारी देखील दुकाने सुरू केलीत. त्यामुळे एका किराणा दुकानासह कपडे विक्रीचे दुकान मनपाकडून सील करण्यात आले.
गोलाणी व फुले मार्केटमध्ये अद्याप अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायाची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही मंगळवारी मोबाईल दुरुस्तीची दोन दुकाने उघडण्यात आली होती. त्यांच्यावरही मनपाकडून कारवाई करण्यात आली. यासह एका आंबे विक्रेत्याचेही दुकान सील करण्यात आले.
शेड बंद करून सुरू झाला व्यवसाय
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जात आहे तर दुसरीकडे व्यवसाय सुरू करण्याची मागणी देखील व्यापाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन 5 मध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. मात्र, मोठ्या संकुलातील दुकानांना अद्याप व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तर मुख्य रस्त्यावरील दुकाने देखील सम-विषम प्रमाणात उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मात्र, तरीही अनेक व्यावसायिक दररोज आपला व्यवसाय करत आहेत.
बळीराम पेठ, फुले मार्केट परिसर, गणेश कॉलनी चौक परिसरात अनेक दुकानदार आपले शेड बंद करून दुकानांमध्ये व्यवसाय सुरू ठेवत आहेत. दुकानाबाहेर शुकशुकाट असतो, दुकानात मात्र नागरिकांची गर्दी असते, असे केलेल्या पाहणीत आढळून आले.