जळगाव - शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, म्हणजेच जिल्हा कोविड रुग्णालयात एका कोरोना संशयित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोव्हिड रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक 6 मध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर साधारण 1 वाजताच्या सुमारास घडली. मृत व्यक्ती जामनेर तालुक्यातील पहूर येथील रहिवासी आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीची प्रकृती बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी खबरदारी म्हणून त्यांची कोरोनासाठी अँटीजेन चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु, त्रास जाणवत असल्याने त्यांना कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी जळगाव येथे कोविड रुग्णालयात हलविण्यात आले होते. 9 सप्टेंबर रोजी त्यांना पहुरच्या ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक 6 मध्ये उपचार सुरू होते. 10 सप्टेंबर रोजी त्यांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्त्राव घेण्यात आले होते. मात्र, त्यांचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच त्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या घटनेसंदर्भात जिल्हा कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित रुग्णास 9 सप्टेंबर रोजी कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 सप्टेंबर रोजी त्यांचा आरटीपीसीआर चाचणीसाठी स्त्राव घेतले होते. गुरुवारी रात्री त्यांनी उशिरापर्यंत जेवण घेतले नव्हते. वॉर्ड क्रमांक 6 मधील नर्स त्यांना जेवण आणि औषधे घेण्यासाठी विनंती करत होते. पण त्यांनी उशिरापर्यंत प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वेळ झाल्याने नर्सने त्यांना झोपण्याची विनंती केली. नंतर नर्स त्यांच्या खोलीत गेल्या. पुन्हा रात्री 12.30 वाजेच्या सुमारास नर्स राऊंडला गेल्या असता रुग्ण बेडवर नव्हता. म्हणून त्यांनी इतरत्र शोधाशोध केली. तरीही रुग्ण सापडत नसल्याने नर्सने डॉक्टरांना माहिती दिली. तेव्हा सर्वांनी धाव घेऊन पाहणी केली असता, वॉर्ड क्रमांक 6 च्या बाजूच्या खोलीत रुग्णाने गमछाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेनंतर डॉक्टरांनी मला कळवले. मी लागलीच घटनास्थळी दाखल झालो. नंतर आम्ही पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, अशी माहिती डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा : मराठा आरक्षण टिकवणारच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रण