जळगाव - विदर्भ आणि मध्यप्रदेशात पूर्णा व तापी नदीच्या उगम क्षेत्रात गेल्या २ ते ३ दिवसात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाचे ४ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे जलसंपदा विभागाकडून तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हतनूर धरणाच्या ४ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने खान्देशातील जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीकाठावरील गावातील नागरिकांना जलसंपदा विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विदर्भ तसेच मध्यप्रदेशात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पूर्णा नदीच्या पाणीपातळीत सुमारे २ मीटरने तर तापी नदीच्या पाणीपातळीत अर्ध्या मीटरने वाढ झाली आहे.
मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने तापीसह पूर्णा नदीची पाणी पातळी खालावली होती. त्यामुळे हतनूर धरणातून सुरू करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला होता. मात्र, आता विदर्भ आणि मध्यप्रदेशात चांगला पाऊस होत असल्याने या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.