जळगाव - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात रविवारी २८१ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यात सर्वाधिक ८८ पॉझिटिव्ह रुग्ण हे एकट्या जळगाव शहरातील आहेत. दुसरीकडे, रविवारी दिवसभरात ७ रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ७३२ इतकी झाली असून ती दहा हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाला रविवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये जळगाव शहर ८८, जळगाव ग्रामीण २२, भुसावळ २१, अमळनेर ९, चोपडा २२, पाचोरा १४, भडगाव ९, धरणगाव २, यावल ७, एरंडोल २७, जामनेर १६, रावेर १२, पारोळा २, चाळीसगाव ११, मुक्ताईनगर १७ आणि दुसऱ्या जिल्ह्यातील २ अशा एकूण २८१ नव्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात सातत्याने मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.
हेही वाचा - संतापजनक! कोरोनाबाधितांना नेण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने मागितले नऊ हजार रुपये..
जिल्ह्यात ६ हजार २९१ रुग्ण झाले कोरोनामुक्त -
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ७३२ झाली आहे. त्यापैकी ६ हजार २९१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. सध्या २ हजार ९७४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रविवारी २४८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रविवारी जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू -
कोरोनामुळे रविवारी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव तालुका, पाचोरा तालुका, चोपडा तालुका, रावेर तालुका, चाळीसगाव तालुका व भडगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.