जळगाव - शहरातील कोर्ट चौक ते रिंगरोड चौकादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या अतिक्रमणांवर बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. या कारवाईवेळी अतिक्रमणधारकांनी केलेल्या विरोधामुळे काही ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. राजकीय पदाधिकाऱ्यांकडून देखील यावेळी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात होता. मात्र, उपायुक्त अजित मुठे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत दबाव झुगारुन लावले. त्यामुळे २५ अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली
जळगाव शहरातील कोर्ट चौक ते गणेश कॉलनी चौक हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे. मात्र, या रस्त्यावर दोन्ही बाजूला अतिक्रमणे झाल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. कोर्ट ते ख्वॉजामियाँ चौकापर्यंतच्या रस्त्यावर देखील दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. अनेकांच्या तक्रारी देखील येत असतात. जे. टी. चेंबरच्या ठिकाणी अनेक दुकानदारांनी ओट्यांचे पक्के बांधकाम करून उंची वाढवून घेतली होती. यामुळे १८ मीटरचा रस्ता १२ मीटरचा झाला होता. तसेच या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना ओट्यांच्या पुढेच वाहने उभी करावी लागत होती. त्यामुळे ५ ते ६ फुटांचा रस्ता केवळ पार्किंगमध्येच जात होता. अखेर बुधवारपासून महापालिकेने या रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. कोर्ट चौकातील जे. टी. चेंबरच्या अतिक्रमणापासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. उपायुक्त अजित मुठे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक एच. एम. खान, नगररचना विभागाचे अभियंता समीर बोरोले व अतुल पाटील यांचाही समावेश होता. अतिक्रमणच्या पथकाने सुरुवातीला सर्व ओटे व पुढे आलेले शेड पाडायला सुरुवात केली. त्यापुढे काही कार्यालयांचे ओटे देखील तोडण्यात आले. यावेळी काही दुकानदारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला.
मनपाच्या शाहू रुग्णालयासमोरील ढाके कॉम्प्लेक्समध्ये रस्त्यापर्यंत बांधलेला चौथराही कारवाईदरम्यान तोडण्यात आला. यावेळी आयसीआयसीआय बँकेचे संचालक व इमारतीचे आर्किटेक्ट यांनी मनपा उपायुक्तांकडे कारवाई थांबविण्याची मागणी केली. तसेच काही पदाधिकाऱ्यांचेही उपायुक्तांशी बोलणे करून दिले. मात्र, उपायुक्तांनी कारवाई थांबविण्यास नकार दिला. मनपाने कारवाई करण्याआधी नोटीस देण्याची गरज असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, मनपाने दीड महिन्यांपूर्वी संबधित इमारत मालकाला नोटीस दिल्याने कारवाई सुरुच ठेवण्याचा सूचना उपायुक्त मुठे यांनी अतिक्रमण पथकाला दिल्या.
विरोधामुळे काहीवेळ गोंधळ -
मनपा अतिक्रमण विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईच्या वेळेस काही दुकानदार व कार्यालयांच्या मालकांनी विरोध केल्यामुळे काही काळ गोंधळ झाला. त्यामुळे कारवाई देखील थांबविण्यात आली होती. यावेळी कार्यालय व ओटे तोडण्याआधी मनपा प्रशासनाने न्यायालयाचीही भिंत देखील तोडावी, अशी मागणी दुकानदारांनी केली. मनपा उपायुक्तांनी या रस्त्यावरील प्रत्येक अतिक्रमणावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कारवाईला पुन्हा सुरुवात करण्यात आली.