जळगाव - मेहरुण तलाव परिसरात फिरायला गेलेल्या साईनाथ शिवाजी गोपाळ (२२, रा.समता नगर, जळगाव) हा हातपाय धुतांना पाय घसरुन पडल्याने तलावात बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली. कालपासून या तरुणाच्या शोध लागलेला नाही. गुरुवारी दुपारपर्यंत साईनाथ सापडलेला नसून महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक तसेच पोलीसांकडून शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, साईनाथ हा मजुरीचे काम करायचे. बुधवारी साईनाथ व त्याचा भाऊ सुकलाल यांना पिंप्राळा रेल्वे गेटजवळ साफसफाईचे काम मिळाले होते. दुपारपर्यंत तेथे काम केल्यानंतर मामाचा मुलगा ज्ञानेश्वर अर्जुन गोपाळ व आणखी एक असे दोघं तेथे आले व दुचाकीवर बसवून घेऊन गेले. तिघं जण मेहरुण तलावाकडे फिरायला आले. सेंट टेरेसा शाळेच्या पाठीमागील बाजुस तिघं जण तलावात हातपाय धुवायला उतरले असता साईनाथ हा याचा पाय निसटला व तलावातील खोल खड्डे असलेल्या ठिकाणी पाण्यात बुडाला.
हा प्रकार पाहिल्यानंतर मामाच्या मुलांनी त्यांच्या आईला सांगितला. आईने तातडीने साईनाथच्या आई, वडीलांना सांगून सर्वच नातेवाईकांनी साडे सहा वाजता तलावावर धाव घेतली. भाऊ सुकलाल, वडील शिवाजी रामा गोपाळ व इतर नातेवाईकांनी तलावात त्याचा शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही.