जळगाव - शहरात एका १३ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ब्रुक बॉंड कॉलनीत बुधवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. भूषण कैलास भोई (वय १३, रा. ब्रुक बॉंड कॉलनी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
सातवीच्या वर्गात घेत होता शिक्षण-
भूषण विद्युत कॉलनीतील शकुंतला विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकत होता. भोई कुटुंबीय मुळचे नशिराबाद येथील आहे. भूषणचे वडील कैलास रतन भोई व आई रत्नाबाई हे दाम्पत्य दोन्ही मुलांसह उल्हासनगर येथे राहत होते. चार वर्षांपूर्वीच ते जळगावात स्थायिक झाले. अग्रवाल चौकात चहाची टपरी चालवून ते उदरनिर्वाह करीत होते. मोठा मुलगा भूषण सातवीत तर लहान विशाल हा पाचवीत शिकत होता. ब्रुक बॉंड कॉलनीत एका भाड्याच्या खोलीत भोई कुटुंबीय तसेच रत्नाबाई यांचे वडील भीमराव मांगो भोई व आई लक्ष्मीबाई हे सर्वजण एकत्र राहत होते.
घरी जाऊन येतो सांगून गेला, तो परत आलाच नाही-
बुधवारी सकाळी त्याचे वडील नशिराबाद येथे गेलेले होते. तेव्हा तो चहाच्या टपरीवर होता. त्याचे आजी-बाबा बँकेचे काम आटाेपून आल्यानंतर त्याने आईकडून घराची किल्ली घेतली. थोडा वेळ घरी जाऊन येतो सांगून तो घरी आला होता. यानंतर त्याने छताच्या हुकास दोरी बांधून पायाखाली स्टूल घेऊन गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळानंतर त्याचे बाबा भीमराव घरी आले. दरवाजा ठोठावल्यानंतरही तो उघडत नव्हता. भूषण झोपला असेल, अशी समजूत करुन घेत ते पुन्हा दुकानाकडे निघून गेले. यानंतर त्याची आई घरी गेली. तेव्हा देखील घराचा दरवाजा उघडत नव्हता. संशय आल्यामुळे नंतर टॉमीच्या साह्याने दरवाजा तोडण्यात आला. यावेळी भूषणने गळफास घेतल्याचे समोर आले. हे पाहताच त्यांना प्रचंड धक्का बसला.
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद-
घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.