जळगाव - जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुके कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. पाचोरा पाठोपाठ आता शेजारील भडगाव तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने व्हायला सुरुवात झालीय. जिल्हा प्रशासनाला सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 13 संशयित रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 279 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर या ठिकाणांहून स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज सकाळी प्राप्त झाले आहेत. यापैकी 35 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगावचे 12 तर भुसावळ येथील एकाचा समावेश आहे. पुन्हा 13 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 279 झाली आहे.
भडगावातही उद्रेक होण्याची भीती
सुरुवातीला जळगाव शहरात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अमळनेर, भुसावळ, चोपडा आणि पाचोऱ्यात सातत्याने कोरोनाचा प्रसार झाला. आता पाचोरा तालुक्याशेजारील भडगावातही कोरोनाचा शिरकाव झालाय. याठिकाणी एकाच वेळी तब्बल 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता भडगाव शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमळनेरकरांना काहीसा दिलासा
मागील काही आठवड्यांत अमळनेर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सातत्याने आढळत होते. पाहता पाहता अमळनेरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली होती. मात्र, आता गेल्या 3 ते 4 दिवसांपासून याठिकाणी रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे अमळनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.