जळगाव - विदर्भ आणि मध्यप्रदेशात पूर्णा व तापी नदीच्या उगम क्षेत्रात गेल्या आठवडाभरात जोरदार पाऊस झाला. यामुळे जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाचे १२ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत.
हतनूर धरणाच्या १२ दरवाज्यांतून प्रतिसेकंद ७७८ क्युमेक्स अर्थात २७ हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने खान्देशातील जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीकाठावरील गावातील नागरिकांना जलसंपदा विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत विदर्भ तसेच मध्यप्रदेशात जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा नदीच्या पाणीपातळीत अडीच मीटरने तर तापी नदीच्या पाणीपातळीत अर्ध्या मीटरने वाढ झाली आहे.
राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दुष्काळी गावांना होणार फायदा-
जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत दुष्काळ आहे. अद्यापही काही गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, आता हतनूर धरणातून तापी नदीपात्रात पाणी सोडल्याने तापी नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या दुष्काळी गावांतील पाणीयोजनांना या पुराच्या पाण्याचा फायदा होणार आहे.