जळगाव अपघात : आभोड्यातील एकाही घरात पेटली नाही चूल; 11 जणांची एकाच वेळी निघाली अंत्ययात्रा - jalgaon kingaon accident funeral
सोमवारची सकाळ जळगाव जिल्हावासीयांसाठी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटनेची बातमी घेऊन आली. पपई घेऊन जाणारा (एमएच 19 झेड 3568) क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याने ट्रकमधील 15 मजूर ठार झाले. यात 7 पुरुष, 6 महिला आणि 2 बालकांचा समावेश आहे. अपघातात ठार झालेल्यांमध्ये सर्वाधिक 11 जण हे आभोडा गावातील रहिवासी होते. आभोडा गावातील बहुसंख्य मजूर हे हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. अपघातात ठार झालेले मजूर देखील अशाच प्रकारे मोलमजुरी करणारे होते.
![जळगाव अपघात : आभोड्यातील एकाही घरात पेटली नाही चूल; 11 जणांची एकाच वेळी निघाली अंत्ययात्रा 11 people funeral at a one time in abhoda jalgaon district jalgaon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10636335-42-10636335-1613387652479.jpg?imwidth=3840)
जळगाव - जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ घडलेल्या भीषण अपघातात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला. या 15 जणांमध्ये रावेर तालुक्यातील आभोडा गावातील सर्वाधिक 11 जणांचा समावेश आहे. त्यामुळे आभोडा गावासह जिल्ह्यावर एकच शोककळा पसरली आहे. गावातील 11 जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याने आभोडा गावातील एकाही घरात सोमवारी चूल पेटली नाही. मृत्यू झालेल्या 11 जणांची अंत्ययात्रा एकाच वेळी निघाली. या घटनेमुळे संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. अंत्ययात्रेत मृतांच्या कुटुंबीयांनी हृदय हेलावणारा आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांनाही अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
सोमवारची सकाळ जळगाव जिल्हावासीयांसाठी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटनेची बातमी घेऊन आली. पपई घेऊन जाणारा (एमएच 19 झेड 3568) क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याने ट्रकमधील 15 मजूर ठार झाले. यात 7 पुरुष, 6 महिला आणि 2 बालकांचा समावेश आहे. अपघातात ठार झालेल्यांमध्ये सर्वाधिक 11 जण हे आभोडा गावातील रहिवासी होते. आभोडा गावातील बहुसंख्य मजूर हे हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. अपघातात ठार झालेले मजूर देखील अशाच प्रकारे मोलमजुरी करणारे होते. ते धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पपई भरण्याच्या कामासाठी गेलेले होते. रविवारी दिवसभर काम केल्यानंतर ते ट्रकमधून रावेरकडे येत होते. याच दरम्यान, किनगावजवळ त्यांच्या ट्रकला अपघात झाला. त्यात त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला.
गुन्हा दाखल -
या अपघात प्रकरणी ट्रकचालकासह पपई व्यापारी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना यावल पोलिसांनी अटक केली आहे.
झोपेतच काळाचा घाला -
साक्रीहून निघाल्यानंतर ट्रकमध्ये बसलेल्या मजुरांचा डोळा लागला होता. मजूर झोपेत असताना ट्रक उलटला. त्यात सर्व मजूर रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत कोसळले. त्यांच्या अंगावर पपई आणि वरून ट्रक यात दबले जाऊन मजुरांचा मृत्यू झाला. झोपेत असताना या मजुरांवर काळाने झडप घातली.
किनगावकरांनी घेतली मदतकार्यासाठी धाव -
मजुरांच्या ट्रकला अपघात झाल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांच्या लक्षात आले. त्यांनी या अपघाताची माहिती किनगाव येथील काही ग्रामस्थांना दिली. त्यानंतर किनगावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्यासाठी धाव घेतली. नंतर यावल पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. ट्रकमधील मजूर चारीत पपई आणि ट्रकखाली दबले गेले होते. त्यामुळे किनगाव येथून रात्रीच जेसीबी आणि क्रेन मागवून आतमध्ये अडकलेले मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना तत्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
अंत्ययात्रेत पंचक्रोशीतील ग्रामस्थांची हजेरी -
या अपघातात आभोडा गावातील 11 जणांचा मृत्यू झाल्याने एकाच वेळी त्यांची अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेत आभोडा पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, अनेकांना अश्रू अनावर झाले. गावात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने अंत्ययात्रा निघाली. या घटनेमुळे गाव सुन्न झाल्याचे पाहायला मिळाले.
![11 people funeral at a one time in abhoda jalgaon district jalgaon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-jlg-06-abhoda-funeral-7205050_15022021153402_1502f_1613383442_450.jpg)
या घटनेत आभोडा गावातील एकाच कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे. मोरे, वाघ व भालेराव कुटुंबीयांचा मृतांमध्ये समावेश असून, ते एकमेकांचे नातेवाईक आहे. दोन जण रावेर तालुक्यातील विवरा येथे राहायला गेले असल्याची माहिती मिळाली. या घटनेविषयी माहिती देताना मृतांचे नातेवाईक पद्माबाई तसेच वामन वाघ यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या तोंडातून शब्दही निघत नव्हते. या घटनेमुळे आमचे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे. आम्ही उघड्यावर आलो आहोत. काळ आमच्यावर एवढा का रुसला, अशा शब्दांत ते भावना व्यक्त करत होते. आम्ही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. राज्य शासनाने आम्हाला काहीतरी मदतीचा हात द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
शासनाने मृतांच्या कुटुंबांच्या पाठीशी उभे रहावे - अनिल चौधरी
या घटनेसंदर्भात पत्रकारांशी बोलताना भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले की, या घटनेमुळे गोरगरीब कुटुंब उघड्यावर आले आहेत. राज्य शासनाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. त्यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांच्या मदतीची घोषणा -
या घटनेनंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी आभोडा गावाला सांत्वनपर भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाच्या वतीने त्वरित दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल, अशी घोषणा केली. राज्य शासन मृतांच्या नातेवाईकांचा पाठीशी उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
![11 people funeral at a one time in abhoda jalgaon district jalgaon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-jlg-06-abhoda-funeral-7205050_15022021153402_1502f_1613383442_1038.jpg)
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निरीक्षक प्रताप दिघावकर यांनी या घटनेची माहिती मिळताच त्वरित जळगावकडे प्रयाण केले. यांनी यावल तालुक्यातील किनगाव येथे घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी दिघावकर यांनी अपघाताची माहिती आणि मृतांच्या संदर्भातील माहिती जाणून घेतली.