जळगाव - जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रसार वेगाने सुरु आहे. आज पुन्हा 156 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4586 इतकी झाली आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील कोरोना बळींची वाढती संख्या देखील चिंता वाढवत आहे. सोमवारी एकाच दिवशी 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात 282 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाला सोमवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकूण 156 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात जळगाव शहर 56, जळगाव ग्रामीण 18, अमळनेर 7, भुसावळ 12, भडगाव 3, बोदवड 1, चोपडा 8, धरणगाव 7, एरंडोल 1, जामनेर 13, मुक्ताईनगर 10, पाचोरा 4, रावेर 12 आणि यावल येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. आज चाळीसगाव व पारोळा येथे एकही रुग्ण आढळला नाही, ही एक दिलासादायक बाब आहे. जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 1587 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 2717 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी 106 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.
तब्बल 11 जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या वाढतच आहे. गेल्या काही दिवसात एका दिवसाला 7 ते 11 जणांचा दररोज मृत्यू होत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. सोमवारी देखील 11 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चाळीसगाव तालुक्यात 64 वर्षीय व 80 वर्षीय अशा दोन पुरुषांचा मृत्यू झाला आहे. पारोळा तालुक्यात 55 वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील 83 वर्षीय पुरुष, एरंडोल तालुक्यातील 73 वर्षीय पुरुष व 80 वर्षीय महिला, भडगाव तालुक्यातील 45 वर्षीय महिला, यावल तालुक्यातील 73 वर्षीय व 62 वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष व जळगाव शहरातील 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.