हिंगोली - सध्या रब्बीचा हंगाम जोरात सुरू आहे. शेतकरी रात्रीचा दिवस करीत पिकाला पाणी देत आहेत. शेतातील पिकाला पाणी देणाऱ्या वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन जात असताना, रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील रहिवीसी देवानंद जनार्धन चक्के (18) असे मयताचे नाव आहे. देवानंदचे वडील हे शेतात पिकाला पाणी देत होते. पिकांना पाणी देणाऱ्या वडिलांसाठी जेवणाचा डबा देवानंद घेऊन जात होता. शेतापासून काही अंतरावर असलेल्या रोहित्रातून गेलेला विद्युत तार रस्त्यावर तुटून पडली होता. त्याला स्पर्श होऊन देवानंदचा जागीच मृत्यू झाला. देवानंद हा इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. या भागात यापूर्वीही शॉक लागून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या या आलबेल कारभाराबद्दल शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
तीन भावंडांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला -
दिवसेंदिवस विजेचा शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. जालना जिल्ह्यातील पळसखेड पिंपळे येथे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तीन सख्या भावंडाचा शॉक लागून मृत्यू झाल्याने, संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना ताजी असताना हिंगोली जिल्ह्यात शॉक लागून युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकरी आता हादरून गेले आहेत. मात्र, वारंवार घडणाऱ्या घटनेने विद्युत वितरण कंपनीचा कारभार चव्हाट्यावर आल्याचे जनसामान्यांतून बोलले जात आहे.
हेही वाचा - लग्नावरुन परतणाऱ्या १४ वऱ्हाडींवर काळाचा घाला; उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील घटना