हिंगोली (औंढा नागनाथ) - गेल्या 5 महिन्यांपासून औंढा नागनाथमधील घंटागाडी चालकांचे पगार न झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. दिवाळीला देखील त्यांचे वेतन मिळाले नाही, त्यामुळे हे कामगार आक्रमक झाले आहेत. बुधवारी त्यांनी कामबंद आंदोलन केले असून, पगार न मिळाल्यास कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांनी दिला आहे.
आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथमध्ये दिवस रात्र राबून शहर स्वच्छ ठेवणाऱ्या घंटागाडी चालकांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. कोरोना काळात देखील जीवाची परवा न करता त्यांनी सेवा दिली. मात्र असे असून देखील त्यांना त्यांच्या हक्काचा पगार मिळाला नाही. एवढेच नव्हे तर चालकांनी पगार वाढवण्याची मागणी केली असता, त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे.
उसनवारी करून केली दिवाळी साजरी
दिवाळी हा वर्षातला सर्वात मोठा सण असतो. पाच महिने पगार झाला नाही, निदान आता दिवाळीला तरी पगार होईल अशी अशा होती, मात्र दिवाळीला देखील पगार झाला नाही. पगाराची मागणी केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे उसने पैसे घेऊन दिवाळीचा सण साजरा केला. अशा आपल्या व्यथा या कामगारांनी मांडल्या आहेत.
हक्काच्या पगारासाठी आंदोलन
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र धडपड करतो, दिवसरात्र कष्ट करतो, कोरोनाच्या काळातही आम्ही काम केले, मात्र अजूनही आमचा पगार झालेला नाही. आम्ही आमच्या हक्काच्या पगारासाठी हे आंदोलन करत असल्याची माहिती या कामगारांनी यावेळी दिली. दरम्यान रिपब्लिकन सेनेच्या वतीने या कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. घंटागाडी चालकांचे वेतन तात्काळ द्यावे, अन्यथा कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घालू, असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा - आदिवासी मत्र्यांना 'खावटी' दिवाळी भेट; श्रमजीवी संघटनेचा पेठ तहसीलवर मोर्चा
हेही वाचा - नाशिक पोलिसांसमोर वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान