हिंगोली - प्लास्टिकचा वापर कायमस्वरूपी बंद होण्यासाठी संभाजी विद्या सागर संघामार्फत कार्यक्रमांसाठी मोफत स्टीलची भांडी पुरवण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी मीराबाई गायकवाड यांनी 'बर्तन बँक' नामक उपक्रम सुरू केला असून, यामार्फत त्या जनजागृती करत आहेत.
नगरपालिकेने शहरात स्वच्छता मोहिम राबवली असून, संपूर्ण शहर प्लास्टिक मुक्त केले आहे. तसेच हागणदारी मुक्त करण्यावरही शंभर टक्के अंमल केला आहे. पालिकेने सर्वाधिक प्लास्टिक बंदीवर भर देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
मीराबाई यांच्या अनोख्या बँकेद्वारे आता शहरात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांमधील प्लास्टिक वापरावर काही प्रमाणात नियंत्रण येण्यास मदत होत आहे. वाढदिवस, नामकरण सोहळा, साखरपुडा, आदी लहान कार्यक्रमांना या बर्तन बँकेद्वारे मोफत स्टीलची भांडे पुरवतात.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कार्यक्रमात भांडी वापरल्यानंतर स्वच्छता करण्यासाठी महिलांना मजुरी दिली जाते.
शहरांमध्ये कुठेही कार्यक्रम असल्यास बर्तन बँकमधून मोफत स्टीलची भांडे मिळत असल्याने आता शहरात ही बँक चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. या बँकेमुळे वेगवेगळ्या कार्यक्रमातील प्लॅस्टिकच्या वस्तू वापरावर आपसूकच आळा बसत असून पैशांची बचत होत आहे.
या उपक्रमासाठी मीराबाई गायकवाड, वर्षा सोनुणे, शोभा डाखोरे, कमलाबाई गायकवाड, कौसाबाई सोनुणे, भारताबाई घोडे, मीराबाई आठवले, लताबाई चांदणे, शांताबाई शेंडे, रत्नाबाई कांबळे, रेखाबाई सोनुणे, ज्योती गायकवाड, अशा गायकवाड अशा अनेक महिलांनी पुढाकार घेतला आहे.
नगरपालिकेच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होता आल्याचे समाधान वाटत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून पर्यावरणाचे रक्षण करावे; तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सुजाण नागरिकाची भूमिका बजवावी, असे आवाहन विद्यासागर महिला संघाच्या वतीने मिराबाई गायकवाड यांनी केले.