हिंगोली- शेतात काम करीत असताना अचानक आलेल्या रानडुकराने शेतकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. शेतकऱ्यावर सेनगाव येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आहे.
हेही वाचा- देशात ४० हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त; मागील २४ तासांत २ हजार ४८७ रुग्णांची नोंद
प्रल्हाद देवबा जायभाये (वय ५०) रा. वेलतुरा असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी शेतीची कामे उरकून घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील वेलतुरा येथील शेतकरी जायभाये हे आपल्या शेतात मशागतीचे कामे करत होते. अचानक पाठीमागून आलेल्या रानडुकराने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
या हल्ल्यात जायभाये यांना जवळपास 45 टाके पडले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना अकोला येथे उपचारासाठी हलविले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे घरातच बसून राहणारे जायभाय आजच शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्यातच ही घटना घडली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.