हिंगोली - निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोकप्रतिनिधी विकासाचा गाजावाजा करीत असतात. मात्र, स्वातंत्र्यांच्या सत्तरीनंतरही हिंगोलीतील करवाडी गावाला रस्ताच मिळाला नाही. त्यामुळे फक्त एक, दोन नाहीतर तब्बल ३ वेळा गरोदर महिलांना खाटेवर टाकून रुग्णालयात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.
- दहा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता -
करवाडी गाव कळमनुरी मतदारसंघात येते. या मतदारसंघावर गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. सध्या आमदार संतोष टारफे सत्ता गाजवत आहेत, तर यापूर्वी राजू सातव यांनी सत्ता उपभोगली. मात्र, या दोन्ही आमदारांनी फक्त सत्ता उपभोगण्याचेच काम केलेले दिसतेय. गेल्या अनेक वर्षांपासून करवाडी ग्रामस्थ रस्त्याच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींकडे फेऱ्या मारत आहेत. मात्र, त्यांना प्रत्येक वेळी फक्त आश्वासनेच मिळाली आहेत.
- रस्ता दुरुस्तीच्या न्यायालयाच्याही सूचना -
गेल्या अनेक वर्षांपासून कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथून जवळच असलेल्या करवाडी गावात कुठल्याही सोयी-सुविधा नाही. त्यामुळे त्यांना मुलभूत सुविधांसाठी सुद्धा तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. मात्र, रस्त्यामुळे गावात कुठलीही गाडी येत नाही. इतकच काय, तर एखादा गंभीर रुग्ण असेल तर रस्त्याअभावी त्याचा गावातच मृत्यू होतो. गरोदर महिलांना खाटेवर टाकून चिखलाने माखलेला रस्ता तुडवत रुग्णालय गाठावे लागते. यासाठी स्वतः न्यायालयाने रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्यापही रस्ता मिळाला नाही.
- ३ गरोदर महिलांना खाटेवर टाकून पोहोचवले रुग्णालयात -
गेल्या वर्षी एका गरोदर मातेला खाटेवर टाकून रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी अनेकदा रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलने केली. मात्र, प्रशासनाला जाग आली नाही. एवढेच नव्हेतर रस्त्याच्या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार देखील टाकला होता. मात्र, प्रशासनाला पाझर फुटला नाही. त्यामुळे गेल्या ३० जुलैला सुवर्णा गणेश ढाकरे या गरोदर मातेला खाटेवर टाकत चिखल तुडवीत नांदापूर येथे रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी रूचेश जयवंश यांनी करवाडी गावाकडे धाव घेतली. मात्र, रस्त्याअभावी ते देखील गावापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यानंतर देखील रस्त्याचे काम मार्गी न लागल्याने पुन्हा ३ ऑगस्टला एका गरोदर मातेला खाटेवर टाकून रात्रीच्या अंधारात रुग्णालयात पोहोचवण्यात आले. आता देखील गावात ३ गरोदर महिला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालायत न्यायचे कसे? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे.
हेही वाचा - विधानसभा रणधुमाळी: हिंंगोली मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता
लोकसभा निवडणुकीनंतर रस्ता मिळाला नाही. मात्र, आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक तरी लोकप्रतिनिधी गावात येईल. ग्रामस्थांच्या व्यथा समजून घेईल आणि त्यांना रस्ता देईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे. मात्र, आता फक्त मत मागण्यासाठी फिरणारे लोकप्रतिनिधी करवाडी ग्रामस्थांना रस्ता देतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.