हिंगोली - संपूर्ण जगभरात कोरोनाला हरवण्यासाठी यंत्रणा गतीने कामाला लागली आहे. यात कोरोना संशयित तसेच कोरोनाबाधित रुग्णांशी अतिशय जवळून संपर्क येतो तो डॉक्टरांचा. अशात स्वॅब घेणे ही तर मोठी जिकरीची बाब. त्यामुळे डॉक्टरांच्या मनात भीतीचे वातावरण असते. मात्र, हिंगोलीतील उत्सव फाउंडेशनच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाला अद्यावत स्वॅब कलेक्शन बूथ प्रदान करण्यात आले आहे. या स्वॅब कलेक्शन बूथमुळे डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा रुग्ण म्हटलं, की सर्वसामान्यांच्या अंगावर रोमांच येत आहेत. आशा विदारक परिस्थितीत रस्त्यावर पोलीस अन रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आपल्या जीवाची बाजी लावून चोख कर्तव्य बजावत आहेत. कोरोना रुग्णांशी अतिशय जवळून संबंध डॉक्टर अन परिचरिकांचा येत आहे. कोरोना संशयितांचे स्वॅब नमुने घेण्यासाठी डॉक्टरांना जिवाची बाजी लावावी लागते. ही बाब लक्षात घेऊन, उत्सव फाउंडेशनच्या वतीने 40 हजार रुपये किंमतीची अद्यावत स्वॅब कलेक्शन बूथ प्रदान केले आहे. आता या आधुनिक यंत्राच्या साह्याने कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. त्यामुळे हे आधुनिक यंत्र खरोखरच या महाभयंकर परिस्थितीत डॉक्टरांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर, पॅथॉलॉजी लॅबचे डॉ. किशन लखमावर, डॉ. अजय शिराडकर, उत्सव फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण सोनी, उपाध्याय सुनील बगडीया, सचिव मुरली हेडा आदींची उपस्थिती होती. या भेटीबद्दल शल्यचिकित्सक डॉ. किशोर यांनी फाउंडेशनच्या सदस्यांचे आभार मानले.