हिंगोली- प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये कळमनुरी येथे 2 आणि 8 वर्षीय मुलींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघींही कळमनुरी येथील काझी मोहल्ला भागातील रहिवासी आहेत. नांदेड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह महिलेच्या त्या नाती आहेत.
या महिलेच्या संपर्कात आलेल्या 15 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी 2 पॉझिटिव्ह, 2 अनिर्णित आणि 4 नाकारण्यात आले आहेत. तर 7 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अनिर्णित आणि नाकारण्यात आलेले नमुने परत प्रयोगशाळेकडे पाठवले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
काजी मोहला हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. जिल्ह्यात पुन्हा नव्याने दोन रुग्ण वाढले असून, आता जिल्ह्याचा आकडा 240 वर पोहोचला आहे. त्यापैकी 212 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला एकूण 28 रुग्णावर विविध कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू आहेत.
नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या परिसरात आरोग्य पथकामार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर आर.बी.एस.के वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत फिवर क्लनिक देखील सुरू केले आहे. या भागातील नागरिकांची थर्मल व एस.पी.ओ.टू तपासणी करण्यात येत आहे. लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना दाखल करून त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत.
खानापूर चित्ता येथील एक आणि वसमतच्या कुरेशी मोहल्ला येथील एक, असे एकूण दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन्ही रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात वार्डमध्ये उपचार सुरू होते. वसमत येथील कोरोना वार्डमध्ये 3 रुग्णावर उपचार सुरू आहेत. बुधवार पेठ, अशोक नगर आणि मुरुंबा येथील ते रहिवासी आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तसेच कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 7 रुग्णांची प्रकृतीदेखील स्थिर आहे.