हिंगोली- जिल्ह्यातील दोन तालुक्यात शेतकरी आत्महत्येची घटना घडली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील वाळकी येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना आज पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली. तर, दुसऱ्या घटनेत सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील शेतकऱ्याने देखील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. दोन्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
संभाजी लक्ष्मण मुकाडे (वय.५०, रा. वाळकी) तर संजय पिराजी चव्हाण (वय.४०, रा. केलसुला ता. सेनगाव) असे दोन्ही मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. मुकाडे यांना दोन एकर तर चव्हाण याना देखील दोनच एकर शेती असून यंदाच्या मुसळधार पावसाने शेतातील सर्वच पिके हातचे गेले आहे. त्यामुळे डोक्यावर असलेले कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत दोघेही शेतकरी होते. त्यामुळे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून या दोघांनी आत्महत्या केली. मुकाडे यांच्यावर खाजगी चार लाखांचे तर चव्हाण यांच्यावर एक लाखांचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकाने दिली आहे. घटनेची माहिती मिळताच औंढानागनाथ पोलिसांनी वाळकी तर सेनगाव पोलिसांनी केलसुला येथे घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मुकाडे या शेतकऱ्याचा मृतदेह औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे. तर, चव्हाण या शेतकऱ्याच्या मृतदेहाचा पंचनामा सुरू आहे.
जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशा नेस्तानाबूत करून सोडले आहे. चार दिवसापूर्वीही जिल्ह्यात एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. ती घटना आठवणीतून जाते न जाते तोच या दोन्ही शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे सरकार स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अशातच मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू आहे. मात्र, नुकसान भरपाई नेमकी कधी मिळेल ? याच प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आत्महत्येचा आकडा काही केल्या कमी होत नसल्याचे भयंकर चित्र आहे. दोन्ही शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येवरून दुष्काळी परिस्थितीची दाहकता समोर येत आहे. सरकारला मात्र शेतकऱ्यांची अजिबात काळजी नसल्यागत झाले आहे.
हेही वाचा- हिंगोलीत दिवसाढवळ्या पाच घरफोड्या; चोरट्यांचे पोलिसांना आव्हान