हिंगोली - वसमत तालुक्यातील पारडी बागल येथील मित्राकडे रंगपंचमी साजरी करण्यासाठी नांदेडहून आलेल्या दोन तरुणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. अनिल बबनराव खरे(रा. खोब्रागडे नगर) आणि अवधूत आबगोड कोयलवाल(रा. पौर्णिमा नगर) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
नांदेडहून अनिल आणि अवधूत हे दोघेजण आपल्या मित्रांसमवेत पारडी बागल येथील एका मित्राकडे रंगपंचमी साजरी करण्यासाठी आले होते. रंगपंचमी साजरी केल्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला एक शेततळे दिसले. त्यात पोहण्यासाठी जायचे ठरवले. मात्र, काही मित्रांनी नकार दिला. यावेळी कुणाचेही न ऐकता त्यांनी तळ्यात पोहण्यासाठी उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचाही त्यात बुडून मृत्यू झाला.
हेही वाचा - CORONA VIRUS : हिंगोलीत बॉयलर दहा रुपये किलो; तरीही ग्राहकांची पाठ
तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली. यावेळी उशिरापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविले. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, ऐन रंगपंचमीच्या दिवशी दोघांचाही मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - हिंगोलीत 50 लाखांचे सागवान जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई