हिंगोली - माणसाच्या सवयीने किंवा त्याच्या कला गुणाने एखाद्याला नावाची उपमा दिल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, वसमत तालुक्यातील तुळजापूरवाडी येथील एका कडूलिंबाच्या झाडाचे नामकरणच 'आजारमुक्त झाड' असे करण्यात आले आहे. या ठिकाणी लिंबाच्या झाडातून दोन दिवसांपासून पांढरा द्रव गळत असून हा द्रव जखमेवर लावल्याने जखम बरी होते, असा ग्रामस्थांचा समज झाल्यामुळे त्यांनी याचे नावच 'आजारमुक्त झाड' असे ठेवले आहे. या अजब प्रकाराने लिंबाच्या झाडाची जिल्ह्यात चर्चा होत आहे. एवढेच नव्हे ग्रामस्थांनी या झाडाची पूजाअर्चा देखील करण्यास सुरुवात केली असून सकाळ-संध्याकाळ आरती घेतली जात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
वसमत तालुक्यातील तुळजापूरवाडी येथे गेल्या २ दिवसापासून कडूलिंबाच्या झाडामधून पांढऱ्या रंगाचे द्रव बाहेर पडत आहे. त्यामुळे हे झाड तालूक्यात चांगलेच चर्चेला आले आहे. यावर कोणाचाही विश्वास बसत नसल्याने, बरेचजण हा अजब प्रकार पाहण्यासाठी या ठिकाणी धाव घेत आहेत. तर, या झाडाच्या फांद्यामधून अक्षरश: पांढऱ्या रंगाच्या रसाची धार लागल्याचे पाहावयास मिळत आहे. यामागचे कारण अद्याप कळले नसून ग्रामस्थ मात्र चांगलेच हैराण झाले आहेत. येथील ग्रामस्थ एवढ्यावरच थांबले नाहीत तर, त्यांनी निसर्गाचा चमत्कार म्हणत तेथे दगड मांडून, त्याला हळदी कुंकू फासून देवाचीच स्थापना केली. तसेच नियमित २ वेळा पूजा करून आरतीही घेतली जात आहे. अनेकजणांनी या झाडाचा रस अंगावर झालेल्या जखमांवर लावण्यास सुरुवात केली आहे. रस लावल्याने जखम तर बरी होतेच, सोबत आजार देखील बरे होतात असा नागरिकांचा समज आहे.
तुळजापूरवाडीतील ग्रामस्थांनी ही बाब आपल्या नातेवाईकांना कळविली, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे झाड सर्वत्र चांगलच चर्चेला आले आहे. त्यामुळे नागरिकांबरोबर त्यांचे नातेवाईकही आवर्जून ठिकाणी हळद-कुंकू घेऊन दाखल होत आहेत. झाडातून निघणारा रस वाया जाऊ नये म्हणून, त्याला टोपलीत जमा करण्यात येत आहे. तर, येणारे लोकं या टोपलीतील रस बाटलीमध्ये भरून नेत आहेत. रस जखमेवर लावल्याने आजार कमी होत असल्याच्या चर्चेमुळे या झाडाचे नावच लोकांनी 'आजार मुक्त झाड' असे ठेवले आहे.
हेही वाचा - हिंगोलीत शेकडो रोहित्र दाखल; आमदार बांगर यांनी सभागृहात केली होती मागणी
झाडामधून पांढऱ्या रंगाचा रस का बाहेर पडतोय याचे अद्याप उत्तर मिळालेले नाही. मात्र, झाडेही मानवी शरीरानुसारच असतात, ज्याप्रमाणे माणसाच्या शरीराला इजा झाल्यावर त्यातून रक्तस्राव होतो. तसेच झाडांचे देखील आहे. या झाडालाही काहीतरी जखम झाली असावी अन् त्यातून हे द्रव बाहेर निघत आहे. याची पूजाअर्चा करण्याची अजिबात गरज नाही, हळूहळू हा स्त्राव बंद होत जाईल असे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मगरे यांनी सांगितले.
दहा वर्षांपूर्वी अंभेरीत असाच प्रकार घडला होता -
हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या अंभेरी येथेही असेच एक झाड असेच चर्चेत आले होते. याठिकाणी तर ग्रामस्थ एवढे वेडे झाले होते की, कोणताही आजार असल्यास या झाडाच्या सावलीत गेले तर तो बरा होतो, असा त्यांचा समज होता. त्यामुळे, येथेही मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या वाढत होती. शेवटपर्यंत हे झाड कशाचे होते हे कळालेच नाही, मात्र कालांतराने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने तेथे येणार्या नागरिकांची समजूत काढण्यात आली. तेव्हा कुठे तेथील संख्या घटत घटत गेली होती. दरम्यना, येथेही पूजाअर्चा करण्यास सुरुवात झाली होती.
हेही वाचा - ...अन् ही कसली कर्जमाफी; ही तर या सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टाच