हिंगोली - वसमत, कळमनुरी, औंढा, सेनगाव सह हिंगोली शहरामध्ये मोकाट गुरांची संख्या वाढली असल्याने रस्त्यावरील अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तर, आता मोकाट जनावरांपाठोपाठ मोकाट कुत्रेही रस्त्यावर आल्याने वाहतुकीसाठीचा अडथळा वाढला आहे. त्यावर उपाय म्हणून वाहतूक शाखेच्या सपोनि ओमकार चिंचोळकर यांनी जनावरांच्या मालकांना जनावरे सांभाळण्याचे आवाहन केले असून न ऐकल्यास विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे देखील सांगितले.
जिल्ह्यात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही जनावरे थेट रस्त्यावर येऊन बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये काही मारखुंडी जनावरे असल्याने, हे वाहनचालकावर तर कधी पादचाऱ्यावर धावून जात आहेत. यामुळे वाहनचालकांबरोबरच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, नगरपालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने जनावरांबरोबर मोकाट कुत्रीही रस्त्यावर येत असून त्यामुळे अपघाताच्या आकडेवारीत वाढ होत चालली आहे.
हेही वाचा - हिंगोली : अन्न व औषध प्रशासनाच्या नोटीसने मुख्यध्यापकांमध्ये खळबळ
त्यामुळे सोमवारी वाहतूक शाखेने जनावरांच्या बंदोबस्तासाठी गुरांच्या मालकावर कारवाईचा बडगा उगारला. यामुळे निश्चितच रस्त्यावरील जनावरांची संख्या कमी होण्यास मदत मिळणार असून आता जनावरे ताब्यात घेतली जाणार आहेत. ही वाईट परिस्थिती केवळ हिंगोली शहरातच नाही तर इतरही शहरात सुरू असल्याने त्या शहरातही वाहतूक शाखेने असाच कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी नागरिका्कडून केली जात आहे.
हेही वाचा - हिंगोली पोलीस दलातील १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या