हिंगोली - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून निवडणूक रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ हिंगोली येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सभेचे ११ वाजताची वेळ असताना मुंडे यांचे या ठिकाणी आगमन न झाल्याने ग्रामीण भागांतून आलेल्या मतदारांनी व कार्यकर्त्यांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. तर ऐन वर्दळीच्या ठिकाणी नियोजन केलेल्या प्रचार सभेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
हिंगोली येथील गांधी चौक येथे आज महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेची वेळ सकाळी ११ वाजता असल्याने ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मात्र, बराच वेळ होऊनही पंकजा मुंडे यांचे हिंगोली येथे आगमन झाले नव्हते. त्यामुळे बरेच जण परत गेले. विशेष म्हणजे शहारातील महत्वाचे ठिकाण असलेल्या गांधी चौक येथे असलेल्या सभेमुळे सर्वच बाजूंनी रस्ते बंद केले गेले. त्यामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.