हिंगोली - शनिवारी (4 सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील विविध भागांमध्ये हजेरी लावलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत होते, अशातच कळमनुरी तालुक्यातील चिंचोरडी परिसरात गावा शेजारून दुथडी भरून वाहत असलेल्या ओढ्यात एक सहा वर्षीय चिमुरडी वाहून गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली आहे. संध्या तागडे (६) असे या चिमुरडीचे नाव आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी व पोलिसांनी धाव घेऊन चिमुरडीचा शोध सुरू केला. मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण होत होता. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य हे सुरूच होते.
पाण्याच वेग वाढल्याने सुटला संध्याचा हात -
संध्या आपले आजोबा भारत पाईकरावं यांच्याकडे आली होती. कधी नव्हे, ती आज आपले आजोबा व नातेवाईक जयाबाई पाईकराव, पांडुरंग पाईकरावं, यशोदाबाई पाईकरावं यांच्या सोबत शेतात गेली होती. तर सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने सर्वांनीच घराची वाट धरली. तोच त्यांना अर्ध्या मधातच पावसाने गाठले. पावसाचा वेग वाढत होता, तोच त्या सर्वांनी जीवाची जराही पर्वा न करता ओढा ओलांडण्यास सुरुवात केली. पाण्यात शिरतात ओढ्याचे पाणी वाढले अन आजोबांनी पकडलेला संध्याचा हात सुटला. अन क्षणाच्या आता संध्या पाण्यासह वाहून गेली. सर्वांनीच आरडा ओरडा करायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजाने ग्रामस्थ भारत कुरुडेसह अनेकांनी ओढ्याकडे धाव घेतली. घडलेला प्रकार त्यांना कळताच त्यांनी ओढ्याच्या कडेला संध्याचा शोध सुरू केला.
सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी -
शनिवारी सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे ओढे, नदी- नाले दुथडी भरून वाहत होते. संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते.
हेही वाचा - धक्कादायक! उसने पैसे बुडवण्यासाठी वडिलांनी पोटच्या पोराचा गळा चिरला