हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अडकून पडलेल्या आदिवासी मजुरांना आदिवासी विभागांच्या वतीने त्यांच्या स्वगृही पोहोचण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा पायपीट करणाऱ्या 45 मजुरांना घेऊन ट्रॅव्हल दाखल झाली आहे. आतापर्यंत 100 मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. तर आणखी 550 मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्याची तयारी मदत केंद्राद्वारे सुरू आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली.
मात्र, आदिवासी विभागाच्या वतीने या मजुरांना स्वगृही पोहोचण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांनी वाड्या तांड्यावर जावून परजिल्ह्यात कामासाठी गेलेल्या मजुरांची नोंदणी करून घेतली. त्यानुसार आता ज्या-ज्या जिल्ह्यात मजूर अडकलेले आहेत, तेथून खासगी मजुरांना घेऊन वाहने हिंगोलीत दाखल होत आहेत.
आज बुधवारी (दि.13 मे) 45 आदिवासी मजुरांना घेऊन ट्रॅव्हल्स हिंगोलीत दाखल झाली आहे. दाखल झालेल्या मजुरांना सर्व प्रथम मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच या मजुरांना अन्न धान्य पुरविण्यासंदर्भात संबंधित गावातील ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या असल्याचे प्रकल्पाधिकारी राठोड यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात मजुरांचे आगमन होताच, मजुरांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
हेही वाचा - हिंगोलीत 40 दिवसानंतर पहिल्यांदाच धावली 'लालपरी', 125 मजुरांना स्वगृही पोहचवले