हिंगोली - माझा पहिला मुलगा खूप आजारी होता, तो बरा व्हावा म्हणून 3 एकर बागायती जमीन विकून उपचार केले. मात्र, शेवटी तो आम्हाला सोडून गेला. त्यामुळेच आम्ही दुसरा मुलगा संतोषचा लाड करीत होतो. केवळ 10 गुंठ्याच्या शेतात राबून त्याचे शिक्षण करीत होतो. तो अभ्यासात खूप हुशार होता म्हणून त्याला कळमनुरी येथील एका खासगी इंग्रजी शाळेत टाकले. मात्र, त्याचा जावयाने भयंकर घात केला. संतोष गेल्याने तर आता आमची आशाच मावळली आहे, अशा आठवणीने संतोषच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. त्यामुळे मारेकरी जावयाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संतोष शंकर डांगे (14) या बालकाचा मोरवाडी येथील स्वतःच्या भावोजीनेच निर्घृण खून केला. भावोजी तात्याराव जगदेवराव सूर्यवंशी हा लग्न झाले तेव्हापासून पत्नीला भयंकर त्रास देत होता. पत्नीला तो आपल्या आई-वडील, भावासोबत सुद्धा बोलून देत नव्हता. नेहमीच पत्नीवर संशय घेत कधी दोरीने तर कधी बेल्टने मारहाण करीत असे. तसेच तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, असा तगादा लावत होता. ही बाब सासरच्या मंडळींच्या कानावर पडू नये म्हणून तो पत्नीला तिच्या आई-वडिलांच्या संपर्कात येऊच देत नव्हता.
शंकर डांगे यांनी कसेतरी मुलगी दिवाळीचे निमित्त करून माहेरी आणली. तेव्हा हा भयंकर प्रकार उघडकीस आला. पत्नी माहेरी असताना देखील तो तिला लवकर ये नाही तर मी तुझ्या घरातील कुणाला ही संपून टाकेन आशा धमक्या देत होता. मात्र, त्याच्या धमक्यावर कोणी तितके लक्ष देत नसल्याचे शंकर डांगे यांनी सांगितले. तसेच स्वतः सासरे शंकर डांगे यांना देखील त्याने विष घालून मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून त्याच्यावरील विश्वास उडाल्याचे डांगे यांनी सांगितले. मात्र, संतोषला त्याने शाळेत हेरले. संतोष त्याच्या मित्रासोबत सायकलने शिकवणीला जात होता. तेवढ्यात एक क्रुझर जीप आली आणि त्यातील लोकांनी संतोषचे अपहरण केले.
हेही वाचा - अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळला बेपत्ता मुलाचा मृतदेह, हिंगोलीतील घटना
हा सर्व प्रकार त्याच्या मित्राने पहिला. त्याने ही बाब संतोषच्या वडिलांना सांगितली. तेव्हा वडिलांनी धाव घेऊन कळमनुरी पोलीस ठाण्यात संतोषचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. तर इकडे जावई तात्याराव आणि त्याचा भाऊ कैलास सूर्यवंशी या दोघांनी मुळावा, उमरखेड परिसरात अजून काही मित्राच्या सहाय्याने संतोषचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी परिसरात सुरू असलेल्या केबलच्या खोदकामात त्याचा मृतदेह अर्धवट पुरला.
आपल्या जावयानेच क्रूरपणे मुलाला मारले आहे, याचा विश्वासच संतोषच्या आई-वडिलांना बसत नव्हता. मात्र, जेव्हा आरोपी यामध्ये निष्पन्न झाले. तेव्हा जावयाची खरी क्रुरता समोर आली. या घटनेने संपूर्ण जिल्हाच हादरून गेला आहे.
हेही वाचा - उन्नाव बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्री योगींच्या भेटीनंतरच अंत्यसंस्कार, पीडितेच्या कुटुंबीयांची भूमिका
विविध कलमानुसार गुन्हा -
याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात आरोपी तात्याराव सूर्यवंशी आणि त्याचा भाऊ कैलास सुर्यवंशी याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तात्यारावने खुनाची कबुली दिली आहे. यामध्ये अजून कोणत्या आरोपींचा सहभाग आहे याचा पोलीस तपास करीत आहेत. तर आरोपी हा दुसरी नावे सांगत नसल्याचे समोर आले आले. दोघांना ही न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोनि रणजित भोईटे यांनी सांगितले.
विविध राजकीय पुढाऱ्यांकडून सांत्वन -
संतोष डांगे या शाळकरी बालकाचा भावोजीनेच खून केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षाचे नेते आणि नातेवाईक संतोषच्या आई वडिलांची भेट घेत सांत्वन करीत आहेत. तर कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी देखील संतोषच्या कुटुंबाचे सांत्वन करत ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे म्हणून हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले.