हिंगोली - हातामध्ये खडू तर कधी डस्टर घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाऱ्या एका शिक्षकावर चक्क आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी खरकटे टेबल पुसण्याची वेळ येऊन ठेपलीय. ही विदारक कहाणी आहे हिंगोली जिल्ह्यातील ढेगज येथील शिक्षकाची. सरकार म्हणते की, आम्ही शिक्षकासाठी सुविधा दिल्यात. तरीही शिक्षकावर वेटरचे काम करण्याची वेळी आली आहे.
हेही वाचा- शिक्षक आमदार नागो गाणारांचा शिक्षक दिनावर बहिष्कार
मिलिंद पंडित, असे या शिक्षकाचे नाव आहे. घरची परिस्थिती बेताचीच मात्र वडिलांनी पैशाची जुळवाजुळव करून उराशी स्वप्न बाळगून पंडित यांना शिक्षण दिले. वाशिम जिल्ह्यातील शिवणी येथे पंडित यांचे 2010-11 मध्ये डी. एडचे शिक्षण पूर्ण झाले. अनं वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू झाली धडपड. पहिल्याच प्रयत्नात पंडित यांना यशही आले. गावातील जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी पद्धतीने कार्यनुभव शिक्षक म्हणून पंडित यांनी वर्षभर काम केले. मात्र, तेथील पटसंख्या कमी असल्याने, कंत्राटी पद रद्द करण्यात आले, अनं पंडित यांच्यावर नोकरी शोधण्याची वेळ येऊन ठेपली.
अनेक प्रयत्नातून एका खासगी इंग्रजी शाळेत पंडित पुन्हा शिक्षक म्हणून रुजू झाले. काही प्रमाणात आधार मिळाला, मात्र तो काही जास्त काळ टिकू शकला नाही. अपुऱ्या वेतनामुळे त्यांनी नोकरी सोडली. अनं नंतर मिळेल ते काम करून संसाराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्ता व्यक्ती एक अन खाणारे अनेक असल्याने, किती ही काम केले तर पदरात काहीही पडत नव्हते. घरी गुंठाभर शेतीही नाही. त्यामुळे इच्छा नसतानाही पंडित यांनी वेटरची नोकरी पत्करली. त्यामुळे ज्या हातामध्ये पेन अन वही, खडू, असायला पाहिजे ते हात आता टेबल पुसत आहेत.
हेही वाचा- अभिनव शिक्षन संस्थेने 'शिक्षक आपल्या दारी' अभियान राबवून केला शिक्षक दिन साजरा
वेटरचे काम करण्याची फार लाज वाटते ओ, मात्र नाइलाजास्तव हे काम करावे लागत आहे. मुलांना सांभाळण्यासाठी ही नोकरी स्वीकारल्याचे पंडित यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
दुसरीकडे मात्र, सरकार घोकून-घोकून नोकरी दिल्याचे आकडे सांगत आहे. अन् इकडे कित्येक भावी शिक्षकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. डीएड करून तर लाखो शिक्षक बेरोजगार आहेत. तर अनेक जणांनी संसाराचा गाडा चालवण्यासाठी वेग-वेगळे उद्योग थाटले आहेत.