हिंगोली - यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांना आता पेरणीचे वेध लागले आहेत. मात्र, बँका पीक कर्ज देण्यास विलंब करत आहेत. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघा(नाफेड)कडे विकलेल्या तुरीचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे पेरणी हंगामाच्या तोंडावर शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतात चक्क दगडाची पेरणीकरून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावर्षी वेळेत मान्सून दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग तीन ते चार दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे त्यामुळे सध्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, बँकेकडून कर्ज न मिळाल्यामुळे आणि पीक विमा देखील अर्धवट मिळाल्याने शेतकऱ्यांसमोर पेरणी कशी करावी? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अद्याप जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. पेरणीच्या वेळेत पैसे मिळतील या आशेने शेतकऱ्यांनी नाफेडकडे तुर विक्री केली होती. मात्र, नाफेनेदेखील अद्याप शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत.
अगोदरच कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात आता खते, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी जवळ पुरेसा पैसा नसल्याने शेतकरी पुन्हा पेचात पडला आहे. याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दगडांची पेरणी करण्यात आली. निदान आता तरी सरकार शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न समजून घेत त्यांना योग्य वेळेत कर्ज उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा शेतकऱयांनी व्यक्त केली.